LPG गॅसच्या तुटवड्यामुळे पोटाची खळगी भरणारा वडापाव महागला, आता मोजावे लागणार इतके रुपये!

ठाणे : मुंबई-ठाणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेला आणि सर्वसामान्यांचा पोटभरणारा वडापाव आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र दिसत आहे. एकेकाळी पाच रुपयांत मिळणारा वडापाव सध्या २५ ते ३० रुपयांपर्यंत पोहोचला असून, इतर नाश्त्यांच्या दरातही वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे.

इराण-इस्रायल संघर्ष यामुळे निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम अनेक दिवसांपासून इंधन पुरवठ्यावर झाला आहे. गॅस टंचाई निर्माण झाल्याने तसेच सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने छोट्या खानावळी आणि हॉटेल व्यवसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. ठाण्यातील सुमारे ६० टक्के हॉटेल्स तात्पुरती बंद असल्याची माहिती समोर येत आहे. गॅसअभावी अनेक विक्रेत्यांना पारंपरिक चुलीवर वडे तळावे लागत आहेत. मात्र, चुलीसाठी लागणाऱ्या लाकडांचे दरही वाढल्याने खर्चात आणखी भर पडत आहे. त्यातच खाद्यतेलाच्या दरात ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली असून बेसन, बटाटा आणि इतर कच्च्या मालाच्या किंमतीही वाढल्या आहेत. परिणामी, व्यवसाय तोट्यात जात असल्याने विक्रेत्यांना वडापावच्या किंमती वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. याशिवाय, पाव तयार करणाऱ्या बेकऱ्यांनाही गॅस टंचाईचा फटका बसत आहे.

अनेक बेकऱ्या बंद पडल्याने पावाचा पुरवठा कमी झाला असून दर वाढले आहेत. काही ठिकाणी कोळशावर चालणाऱ्या बेकऱ्यांवरच सध्या अवलंबून राहावे लागत आहे. वाढत्या खर्चामुळे विक्रेत्यांना पदार्थांची विविधता कमी करावी लागत आहे. पूर्वी सहज उपलब्ध असणारे कांदा भजी, मुगडाळ भजी, बटाटा भजी यांसारखे पर्याय आता कमी झाले असून बहुतांश विक्रेते फक्त वडापाव वरच भर देत आहेत. त्यामुळे ग्राहकांनाही पर्याय कमी मिळत आहेत. दरम्यान, वडापाव हा कष्टकरी, कामगार आणि प्रवाशांसाठी स्वस्त व झटपट पोटभरणारा पर्याय म्हणून ओळखला जातो. मात्र वाढत्या महागाईमुळे हा ‘गरीबांचा फास्ट फूड’ही महाग होत चालल्याने सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

वडापावसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांच्या दरात वाढ होत आहे. गॅस मिळत नसल्याने चूल वापरावी लागत आहे, पण लाकूडही महाग झाले आहे. पाव विक्रेत्यांनीही दर वाढवले आहेत. त्यामुळे वडापावचे दर वाढविणे अपरिहार्य झाले आहे, अशी माहिती वडापाव विक्रेते प्रसाद म्हात्रे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button