
️यावर्षी करमणूक करात वाढ अटळ; सन २०१७ पासून दिलेली कर सवलत संपुष्टात!
मुंबई : चित्रपट, नाटक, मनोरंजन कार्यक्रमांचे खेळ यंदाच्या वर्षीपासून महाग होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने करमणूक करात वाढ करण्याचे सुतोवाच येत्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात केली आहे. राज्य सरकारने २०१७ पासून राज्य सरकारने करमणूक शुल्कात दिलेली सवलत सप्टेंबर २०२६ ला संपणार आहे. त्यामुळे त्यानंतर करमणूक करात वाढ करण्याचा मुंबई महापालिकेचा विचार आहे.
मुंबई महापालिकेचे उत्पन्न वाढावे याकरीता महसूल वाढीचे विविध उपाययोजनांची घोषणा पालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात केली आहे. त्यात करमणूक कराची वसूली करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून आकारला जाणारा करमणूक कर गोळा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर देण्यात आलेली आहे. मात्र महसूल व वन विभागाने महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियमातील एका तरतूदीनुसार सप्टेंबर २०१७ पासून सप्टेंबर २०२६ पर्यंत करमणूक शुल्कात सूट दिली आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षात या करामध्ये वाढच झालेली नाही. सप्टेंबर २०२६ नंतर करमणूक करात सुधारणा करून नवीन दर लागू करण्याचा मुंबई महापालिकेचा विचार आहे.
राज्य सरकारने दिलेल्या सवलतीचा कालावधी संपल्यानंतर मुंबई महापालिकेमार्फत करमणूक कर वसूल करण्याबाबत अधिसूचना निर्गमित करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पालिका प्रशासनाने पाठवला आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिल्यास अधिसूचना प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून करमणूक कराची वसूली केली जाणार आहे. तसेच झाल्यास नाटक, चित्रपट व मनोरंजनाचे खेळ महाग होण्याची शक्यता आहे. तर मुंबई महापालिकेच्या महसूलात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
चित्रपट, नाटक, सर्कस, आनंदबाजार यांचे प्रयोग व खेळ यांच्यावर करमणूक कर आकारण्याचे अधिकार राज्य सरकारने मुंबई महापालिकेला दिले आहेत. मराठी, गुजराती नाटके, चित्रपट, एकपात्री प्रयोग, तमाशा यांना या कराच्या अधिदानात सवलत असते. २०१४-१५ मधील दरानुसारच हे कर आकारले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळामागे ५० ते ६० रुपये आकारले जात आहेत. या कराच्या दरात दरवर्षी १० टक्के वाढ करावी असा प्रस्ताव महासभेत २०१५ मध्ये मंजूर झाला होता. मात्र त्याला राज्य सरकारने मंजूरी दिलेली नसल्यामुळे जुनेच दर आकारले जात आहेत. त्यातही सवलत दिल्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे.




