
२० वर्षांपासून फरार खून प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद
खेड : तब्बल २० वर्षांपासून फरार असलेल्या खून प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात खेड पोलिसांना मोठे यश आले आहे. २००६ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील हे आरोपी गेली दोन दशके बनावट नावाने राहत असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहूर अब्दुल रज्जाक सुर्वे व गुफरान अब्दुल रज्जाक सुर्वे (दोघेही रा. सवणस, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील फिर्यादी फातिमा इसाक सुर्वे (रा. सवनस, ता. खेड, जि. रत्नागिरी) आहेत.
२००५ मध्ये आरोपींनी मयत आबिदा मियांसो सुर्वे (वय ७५) यांच्या घरातून १० हजार रुपये चोरी केले होते. त्यापैकी ५ हजार रुपये परत केले होते. मात्र उर्वरित रकमेवरून वाद वाढल्याने आरोपींनी आबिदा सुर्वे यांचा खून करून पुरावा नष्ट केला व तेथून फरार झाले होते.
दरम्यान, पोलिसांच्या तपासात आरोपींनी आपली ओळख लपवण्यासाठी नावे व पत्ते बदलल्याचे निष्पन्न झाले. ते राजू गजानन तांबे व संदीप गजानन तांबे या बनावट नावाने मोहो, चिखले (ता. पनवेल, जि. रायगड) येथे राहत होते.
खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने जुने अभिलेख, तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे ७ मार्च रोजी आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे, अजय कडू, विजेंद्र सातार्डेकर, वैभव ओहोळ, शिरीष साळुंखे, कृष्णा दराडे, एएसआय साळवी, विकास पवार व सूरज मोरे यांनी सहभाग घेतला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बागाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक महामुनी व उपविभागीय पोलिस अधिकारी सणस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.




