
हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू घ्याव्यात, असा कार्यक्रम आता….” भाजपाचे मंत्री नितेश राणे यांचे मोठे विधान!
नाशिक : आपल्या आक्रमक आणि जहाल वक्तव्यासाठी ओळखले जाणारे भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा आपली हिंदुत्ववादी भूमिका मांडताना जिहादी प्रवृत्तीविरोधात घोषणा केली.
कुंभमेळ्यासाठी सुरु असलेल्या कामांचा उल्लेख करुन कुंभमेळ्यात एकही जिहादी आला नाही पाहिजे. त्याला धाक वाटला पाहिजे. जिहादी प्रवृत्ती स्टॉल लावण्यासाठी आल्यास स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलो आहोत. जिहादी मानसिकता ठेवणाऱ्या व्यावसायिकांबरोबर व्यवहार करु नयेत. हिंदुंचा पैसा हा हिंदुसाठीच आहे. हिंदुराष्ट्रात हिंदुंविषयी बोलणार नाही तर, पाकिस्तान, इस्लामाबादविषयी बोलणार का, अशी विधाने नितेश राणे यांनी केली.
नाशिक येथे हिंदू हित रक्षा या संस्थेच्या वतीने हिंदू कारागीर आणि लघु व्यावसायिक या यादीचा प्रकाशन सोहळा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात मंत्री राणे यांनी कुंभमेळ्यात अहिंदुंना दुकान लावण्यास विरोध केला आहे.
रमजानमध्ये एकातरी हिंदू माणसाचे दुकान शोधून दाखवावे. हिंदुंनी हिंदुंकडूनच खरेदी केली पाहिजे, अशी भूमिका मी खारघरला मांडली होती. त्यावेळी माध्यमांनी माझ्यावर टीका केली होती. मी कुराण दोन वेळा वाचले आहे. १० टक्के जकात देण्याचा उल्लेख त्यात आहे. २०४७ पर्यंत त्यांना आपल्या हिंदू राष्ट्राला मुस्लीम राष्ट्र करायचे आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून वस्तू खरेदी करणार का? ते धर्मासाठी किती कडवट आहेत, हे तुम्हांला समजावे, यासाठी मी हे सांगत आहे.
आता कुंभमेळ्याची कामे जोरात सुरू आहेत. तुमच्या मागण्या सरकारकडे देतो. मी मागे त्र्यंबकेश्वरमध्ये गेलो होतो, तिथे दुकानावर नाव वेगळे होते. आतमध्ये वेगळी व्यक्ती होती. हिंदुंनी हिंदुंकडूनच वस्तू घेतल्या पाहिजेत, असा कार्यक्रम आता देशात सुरू करणार आहोत. मी इथे हिंदू म्हणून आला आहे. आमदार, मंत्री म्हणून नाही, हे नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
नाशिकमध्ये महापौर, नगरसेवक आपले आहेत. नाशिकमध्ये जय श्रीरामच ऐकू येणार. धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आमच्या राज्यात सर्वात कडक लव्ह जिहादचा कायदा असेल. हे सरकार हिंदू समाजाने निवडून दिले आहे. आम्ही काही मोहल्ल्यात जाऊन मत मागितले नाही. आपल्याच पैशांवर मोहिमा आखल्या जातात.
आपल्याच माता भगिनीना त्रास दिला जातो. सर्वधर्मसमभावाची भूमिका एकट्या हिंदुंनी कुठवर घ्यायची, असा प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केला. यावेळी प्रास्ताविकात हिंदू हित रक्षा संस्थेचे प्रवीण जोशी यांनी, चार एप्रिल रोजी हिंदू व्यावसायिकांची नाशिक जिल्हा सूची तयार करण्यासाठी मेळावा घेण्यात येणार असल्याचे नमूद केले.
यावेळी आमदार सीमा हिरे, कालीचरण महाराज, वीरेन राजे, सुरेंद्रसिंग क्षत्रिय आदी उपस्थित होते.




