
हवामान विभागाने महाराष्ट्रासह १५ राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘हाय अलर्ट’ दिला!
Weather : महाराष्ट्रासह १५ राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘हाय अलर्ट’ तर पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर जास्त असेल. हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील १५ राज्यांमध्ये पावसाचा आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि आर्द्रतेमुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे हे ‘अस्मानी संकट’ ओढवले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीचा धोका
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये गारपिटीची दाट शक्यता आहे. तसेच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर प्रमुख जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. हा पाऊस द्राक्ष, डाळिंब आणि काढणीला आलेल्या गहू-ज्वारीच्या पिकासाठी अत्यंत घातक ठरू शकतो.
महाराष्ट्रावर ‘दुहेरी’ संकट
राज्यात एकाच वेळी दोन टोकाची हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, बीड मध्ये काही भागांत पावसाचा ‘यलो अलर्ट’ आहे.
तसेच कोकण आणि किनारपट्टीच्या भागात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरीमध्ये प्रचंड उकाडा आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत तापमान ३६°C ते ३७°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
इतर राज्यांमधील स्थिती
- महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यांतही हवामान बिघडले आहे.
राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्ये वादळी वारे आणि पावसाचा इशारा आहे. तर गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली (NCR), उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तेलंगणा मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंडमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.




