
हर्णे येथे चुलीच्या भडक्यात भाजलेल्या वृध्देचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू
रत्नागिरी ०५:- दापोली तालुक्यातील हर्णे येथे चुलीवर पाणी तापवत असताना चुलीत आगीचा भडका उडून भाजलेल्या वृध्देचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला.
ही घटना गुरुवार ५ मार्च रोजी सकाळी ११.१० वा. सुमारास घडली. शेवंती बाळकृष्ण चौधरी (६७, रा. हर्णे, दापोली) असे मृत्यू झालेल्या वृध्देचे नाव आहे. त्या मंगळवार ३ मार्च रोजी राहत्या घरी सकाळी ९.३० वा. सुमारास चुलीवर आंघोळीसाठी पाणी तापवत होत्या. त्यावेळी अचानकपणे चुलीत आगीचा भडका उडाल्यामुळे त्यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. त्या भाजून जखमी झाल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र दापोली येथे नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचारांदरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत जिल्हा शासकिय रुग्णालयातील पोलिस चौकित नोंद करण्यात आली आहे.




