
सोनवी पुलाखाली ,केबल ने घेतला पेट …महावितरण कर्मचाऱ्यांची धाडसी कामगिरी
संगमेश्वर | १९ मार्च :- सोनवी पुलाखाली लागलेल्या आगीच्या घटनेत केबल पुढे पुढे पेटत जात असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत होती.मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेळेत धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवत संभाव्य मोठा अनर्थ टाळला. त्यांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.माभळे येथून रात्रीच्या सुमारास संगमेश्वरच्या दिशेने येत असताना वृंदावन हॉटेलचे मालक अवि सप्रे यांच्या निदर्शनास पुलाखालून उठणाऱ्या आगीच्या ज्वाळा आणि धूर दूरवरूनच दिसून आला.
पुलाखालून ठिणग्या खाली पडत असल्याने आगीचा प्रसार सुरू असल्याचे स्पष्ट होत होते.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.घटना स्थळी पोहोचल्यावर पुलाखाली केबल आणि वायरच्या जाळ्याला आग लागल्याचे स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे ही आग एका ठिकाणी मर्यादित न राहता केबलमधून पुढे पुढे पसरत होती. केबल पुढे पेटत जात असल्याने आगीचा विस्तार वाढत होता आणि त्यामुळे धोका अधिक गंभीर बनत होता. सतत ठिणग्या खाली पडत असल्याने खाली साचलेल्या कचऱ्यालाही आग लागून आगीचा फैलाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.
सुरुवातीला या केबल विजेच्या असल्याचा संशय निर्माण झाल्याने मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त होत होती. यामुळे अवी सप्रे यांनी तातडीने मनीष चोचे यांना माहिती दिली. मनीष चोचे यांनी पुढे महावितरणचे अधिकारी फारूक गवंडी यांच्याशी संपर्क साधत परिस्थितीची कल्पना दिली.
माहिती मिळताच फारूक गवंडी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पाहणीअंती संबंधित केबल या दूरध्वनीच्या असल्याचे स्पष्ट झाले, मात्र ती सतत पुढे पेटत असल्याने धोका कायम होता. संबंधित केबल महावितरणची नसतानाही, वाढत जाणारी आग आणि त्यातून निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन त्यांनी तातडीने कारवाई केली आणि आगीवर नियंत्रण मिळवले. वेळीच केलेल्या या कारवाईमुळे आगीचा प्रसार रोखण्यात यश आले आणि पुलाच्या परिसरात मोठी दुर्घटना टळली.या घटनेमुळे काही काळ उपस्थितां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
निवेदिता फास्ट न्यूज




