
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज निवडणूक; राणे आणि चव्हाण समर्थकांमध्ये रस्सीखेच!
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आज, १६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांची महायुती झाली असली, तरी भाजपकडे पूर्ण बहुमत असल्याने अध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
५० सदस्य संख्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपकडे २७, शिंदे शिवसेना १४, ठाकरे शिवसेना ३ आणि ६ अपक्ष असे संख्याबळ आहे. ठाकरे शिवसेना आणि अपक्ष अशा ९ सदस्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला आहे. महायुतीच्या जागावाटपानुसार अध्यक्षपद भाजपकडे, तर उपाध्यक्षपद शिंदे शिवसेनेकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपकडे स्पष्ट बहुमत असले तरी अध्यक्षपदासाठी खासदार नारायण राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या समर्थकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे समर्थकांचे मोठे बळ आहे, तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या समर्थकाचाही विचार केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर उमेदवाराचे नाव निश्चित झाले असून ते एका ‘बंद लखोट्यात’ असल्याचे समजते. हा लखोटा आज प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी उघडला जाणार असल्याने, जिल्हा परिषद अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



