
सहा वर्षांपासून दादर-रत्नागिरी बंद; दादर-गोरखपूर एक्स्प्रेस कायमस्वरूपी धावण्यास सुरुवात
हजारो कोकणवासियांना सेवा देणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर गेल्या सहा वर्षांपासून बंद आहे. या बंद केलेल्या रेल्वेगाडीच्या वेळेत दादर – गोरखपूर रेल्वेगाडी विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येत होती.परंतु, आता ही रेल्वेगाडी कायमस्वरूपी करून, कोकणातील प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत.
रत्नागिरी – लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावर एक पॅसेंजर १९९६-९७ मध्ये सुरू झाली. पुढे प्रवाशांच्या मागणीनुसार ती रत्नागिरी – दादर पॅसेंजर म्हणून चालवली जाऊ लागली. मार्च २०२० पर्यंत ही गाडी प्रवाशांच्या सेवेत होती. करोना काळात ही रेल्वेगाडी बंद करण्यात आली. त्यानंतर मार्गाची क्षमता नसल्याने, लोकल सेवा खोळंबा होत असल्याने आणि वक्तशीरपणाचे कारणे देऊन मध्य रेल्वे प्रशासनाने ही रेल्वेगाडी दादरऐवजी दिवा येथून चालवण्यास सुरुवात केली. परंतु, लोकलचा किंवा रत्नागिरी पॅसेंजरचा वक्तशीरपणा सुधारला नाही. दिवा – दादर मार्गाची क्षमता नसल्याचे कारण देणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने त्याच मार्गावरून दादर-गोरखपूर विशेष रेल्वेगाडी चालवण्यात सुरुवात केली. तर, ही रेल्वेगाडी कायमस्वरूपी चालविण्याची परवानगी रेल्वे मंडळाने दिली. या निर्णयाबाबत राज्यातील प्रवाशांनी विरोध दर्शविला आहे. तसेच लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाच्यावतीने रेल्वे प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मराठी अभ्यास केंद्राचे रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन
मराठी शाळा आणि मराठी भाषेचा जागर आणि प्रसार करणाऱ्या मराठी अभ्यास केंद्राचे लक्ष्य आता भारतीय रेल्वेकडे वळले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दादर – रत्नागिरी एक्स्प्रेस बंद करून दिवा-रत्नागिरी चालवण्यात येत आहे. परंतु, आता दादर-रत्नागिरीच्या वेळेदरम्यान दादर – गोरखपूर चालवण्यात येत आहे. राज्यांतर्गत रेल्वेगाड्या बंद किंवा अंशत: रद्द करून, मराठी माणसाला डावलले जात आहे. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू करण्याचा केंद्राचा विचार असून यासाठी मराठी नागरिकांकडून कौल मागवला आहे.
दादर – रत्नागिरी रेल्वेगाडीच्या वेळेत दादर-गोरखपूर विशेष रेल्वेगाडी आता कायमस्वरूपी केली आहे. याला राजकीय पक्षांकडून विरोध होत आहे. हाच मुद्दा पकडत मराठी अभ्यास केंद्राने रेल्वेत बोकाळलेले उत्तर भारतीय हे या रोगाचे लक्षण असल्याचा आरोप केला आहे. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वेविरूद्ध आंदोलन झाले पाहिजे. मात्र आमचे खासदार काय करत आहेत ? असा सवाल केंद्राचे अध्यक्ष प्रा. दीपक पवार यांनी उपस्थित केला. राज्यातील प्रत्येक रेल्वे स्थानकात सर्व स्तरांवर मराठी माणूस यावा, यासाठी सर्वांनी मिळून कार्यक्रम आखूया, असे आवाहन करत नागरिकांची रेल्वेविरूद्ध आंदोलनाची तयारी आहे का आणि काय आंदोलन करता येईल, हे मोबाइलवर संपर्क साधून कळविण्याचे आवाहन त्यांनी केले.




