समुद्रात पापलेट संपले; बोंबील-मांदेलीवर भूक भागवा!

भाईंदर : सातत्याने समुद्रात कमी होत असलेल्या पापलेटचा हंगाम आता पूर्णतः संपला आहे. त्यामुळे उत्तनच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मासेमारी बोटी आता लहान माशांवर अवलंबून राहिल्या असून खवय्यांनाही बोंबील, मांदेली आदी माशांवरच भूक भागवावी लागणार आहे.उत्तनच्या समुद्रकिनाऱ्यावर जवळपास सातशे मासेमारी बोटी आहेत. प्रामुख्याने जाळ्यात अडकलेल्या माशांवर या मच्छीमारांचा उदरनिर्वाह चालतो.

मात्र मागील काही वर्षांपासून मासेमारी व्यवसाय आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच मासेमारीसाठी सर्वाधिक फायदेशीर ठरणारा पापलेट मासा झपाट्याने कमी होत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पापलेटच्या लहान आकाराच्या पिल्लांची मोठ्या प्रमाणात पकड होत असल्यामुळे त्यांची संख्या घटत असल्याचेही अभ्यासातून समोर आले आहे.

तरीदेखील आर्थिक गाडा चालवण्यासाठी मच्छीमार सतत पापलेटच्या शोधात समुद्रात जात असतात.सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीत मिळणारा पापलेटचा हंगाम मार्चच्या सुरुवातीला पूर्णतः संपल्याचे मच्छीमारांनी सांगितले. परिणामी किनाऱ्यावर, बाजारात तसेच शहरातील बाजारपेठांमध्ये ताज्या पापलेटच्या शोधात असलेल्या खवय्यांची निराशा होत आहे.

सध्या मासेमारी प्रामुख्याने लहान आकाराच्या माशांवर अवलंबून आहे. यात करदी, बोंबील, जवळा, मांदेली आदी माशांचा समावेश आहे. या माशांना उन्हात वाळवून सुक्या स्वरूपात विक्री केल्यास तुलनेने अधिक नफा मिळत असल्याने किनारपट्टीवर सुक्या माशांचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे सध्या मच्छीमारांकडून मोठ्या प्रमाणात मासे वाळवण्याची लगबग सुरू आहे. दरम्यान, पापलेटमुळे निर्माण झालेली पोकळी अधूनमधून मिळणाऱ्या सुरमईमुळे काही प्रमाणात भरून निघत असल्याचेही मच्छीमार सांगतात.

हॉटेलमध्ये मासळीचे दर गगनात

पापलेटचा हंगाम संपल्याने तसेच सुरमईही बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने शहरातील हॉटेलमध्ये मासळीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काही ठिकाणी एका नगासाठी हजार रुपयांहून अधिक दर आकारला जात असल्याचे समोर आले आहे. काही हॉटेलमध्ये बर्फात साठवून ठेवलेली जुनी मासळी वापरली जात असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे वाढलेल्या किमतींमुळे अनेक खवय्ये मासे खाण्याकडे पाठ फिरवत असल्याचे हॉटेल व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.

मच्छीमार आर्थिक संकटात

समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मोठ्या बोटींसाठी एका फेरीत सुमारे एक ते दीड लाख रुपयांपर्यंत डिझेल खर्च येतो. त्यामुळे साधारण सहा लाख रुपयांपर्यंतची मासळी जाळ्यात अडकल्यास ही फेरी यशस्वी ठरते, असे मच्छीमार मानतात. पापलेटला बाजारात मोठी मागणी असल्याने हा संपूर्ण आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात पापलेटवर अवलंबून असतो. मात्र पापलेटची संख्या घटल्याने सध्या मच्छीमारांना लहान माशांवर अवलंबून राहून उत्पन्न मिळवण्याची कसरत करावी लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button