
संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरीच्या वतीने वायंगणी सडा येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न
रत्नागिरी:
ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात या सामाजिक भावनेतून ‘संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी’च्या वतीने रत्नागिरी शहरानजीक असलेल्या वायंगणी सडा, शांतीनगर (पावस रोड) येथे रविवार, २९ मार्च २०२६ रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवला.
सकाळी १० वाजता शिबिराचा प्रारंभ झाला. यावेळी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने रुग्णांची बारकाईने तपासणी केली. यामध्ये प्रामुख्याने नेत्र तपासणी, दंत चिकित्सा, रक्त तपासणी, मधुमेह (शुगर) आणि रक्तदाब (बीपी) यांसारख्या महत्त्वाच्या चाचण्या करण्यात आल्या. केवळ तपासणीच नव्हे, तर ज्या रुग्णांना गरज होती, त्यांना तत्काळ आवश्यक औषधांचे मोफत वाटपही करण्यात आले.
या उपक्रमाचे मुख्य नियोजन संस्थेचे सल्लागार सचिन शिंदे यांनी केले होते. शहरासोबतच ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याची जनजागृती आणि सुविधा पोहोचाव्यात, या उद्देशाने संपर्क युनिक फाउंडेशनने ही आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. संस्थेच्या या कार्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत आहे.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शकील गवाणकर, जिल्हा अध्यक्ष जमीर खलफे, सचिव युसुफ शिरगावकर आणि जनसंपर्क प्रमुख नाझीम मजगावकर उपस्थित होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधत भविष्यातही अशाच प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. या शिबिरामुळे वायंगणी सडा आणि परिसरातील शेकडो नागरिकांना घरबसल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार मिळणे शक्य झाले.




