
संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठेत भरदिवसा घडलेल्या कारफोडीचा हेतू अद्यापही अस्पष्ट
संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठेत भरदिवसा घडलेल्या कारफोडीच्या थरारक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली असून, या प्रकरणामागील नेमके कारण काय, याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
तलवार आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने एका आलिशान होंडा सिटी कारवर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे ही घटना केवळ क्षणिक रागातून घडली की त्यामागे पूर्वीपासूनचा वैयक्तिक सूड दडलेला आहे, याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. संशयित सुरेश दाजी इंजळे याने ज्या आक्रमकतेने वाहनाची तोडफोड केली, त्यावरून हा हल्ला ठरवूनच करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ महिलेसोबत कोणताही ठोस वाद किंवा चिथावणीचा प्रसंग दिसून येत नसल्याने, हल्ल्यामागील मूळ कारण अधिकच गूढ बनले आहे. या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे गर्दीच्या ठिकाणी उभी असलेली तीच आलिशान कार का लक्ष्य करण्यात आली? त्या माडीचा पालक आणि आरोपी यांच्यात कोणते वाद होते? जुना वाद, प्रलंबित आर्थिक व्यवहार की वैयक्तिक मतभेद यापैकी नेमके कोणते कारण या घटनेला कारणीभूत ठरले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. काहींच्या मते, आरोपीचा रोख केवळ वाहनावर नसून वाहनमालकावरही असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, संगमेश्वर पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीला सुरेश इंजळेवर गुन्हा दाखल केला होता. मात्र तपासादरम्यान त्याची पत्नी स्नेहल सुरेश इंजळे आणि अन्य एक साथीदार रोशन ओकटे यांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. पती-पत्नी आणि त्यांच्या साथीदाराने मिळून सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे हिंसक कृत्य केल्याने या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे. तिघांचा सहभाग स्पष्ट झाल्याने हा प्रकार पूर्वनियोजित कट होता का, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्याकडून सुरू असलेल्या सखोल तपासातून कोणते नवे धागेदोरे समोर येतात आणि आरोपींच्या चौकशीतून नेमके कोणते गुपित उघड होते, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.www.konkantoday.com




