संगमेश्वरमध्ये ‘शिंपणे’ उत्सवात भक्तांचा महापूर; लाल रंगाची उधळण


महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला कसबा येथील देवी जाखमातेचा पारंपरिक ‘शिंपणे’ उत्सव बुधवारी (दि. १८ मार्च) अपूर्व उत्साहात आणि भक्तीभावात साजरा झाला. या उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. दिवसभर झालेल्या लाल रंगाच्या मनसोक्त उधळणीमुळे कसबा-संगमेश्वर येथील सर्व रस्ते लालेलाल होऊन गेले होते. ढोल-ताशांच्या कडकडाटासह रंगांची उधळण आणि मटण-भाकरीच्या महाप्रसादाचा आस्वाद घेत भाविकांनी या उत्सवाचा आनंद लुटला.

​शिंपणे उत्सवाची सुरुवात आणि सांगता ढोल-ताशांच्या गजरात काढल्या जाणाऱ्या फेऱ्यांनी झाली. सकाळी ६ वाजल्यापासूनच उत्सवातील रंगांच्या उधळणीला सुरुवात झाली होती. दुपारी ३ च्या दरम्यान मोठ्या चारचाकी वाहनावर लाल रंगाच्या पाण्याची पिंपे भरून आणण्यात आली. या पिंपांमधील लाल रंग फेऱ्यांमध्ये सहभागी झालेल्या सर्व मंडळींवर उडवण्यात आला. केवळ रस्त्यावरच नाही, तर फेऱ्याच्या दुतर्फा असणाऱ्या घरांमधूनही भाविकांच्या अंगावर लाल रंगाचा वर्षाव करण्यात येत होता. दुपारनंतर उत्सवाचा उत्साह आणखीच वाढला. ढोल-ताशांच्या गजरात झांज पथक आणि ‘डीजे’ वरील गाण्यांच्या धुंदीवर हजारो पाय थिरकायला लागले. जवळपास पाच ते सहा तास हा जल्लोष सुरू होता.

​या उत्सवादरम्यान घरोघरी आनंदाचे वातावरण होते. प्रत्येक घरात काजुगर घातलेले मटण, वडे आणि भाकरी असा फक्कड बेत आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे प्रत्येक घरातील सर्व सदस्य एकमेकांना नखशिखांत रंगवत होते. यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता. परंपरेनुसार एकमेकांना रंगवण्यामध्ये जावयाचा मान सर्वाधिक असतो. घरातील सर्व सदस्य जावयाला लाल रंगांनी अक्षरशः न्हाऊ घालत होते. धार्मिक विधी म्हणून कसबा येथील चंडिका मंदिरात, संगमेश्वर येथील निनावी आणि जाखमाता मंदिरात तसेच फणसवणे येथील मूळ जाखमाता मंदिरातही भक्तगांनी दर्शनासाठी सकाळपासून रांगा लावल्या होत्या.

​दुपारनंतर सालाबादप्रमाणे देवाला रखवाली देण्यास सुरुवात झाली. यामध्ये नारळ, कोंबडे आणि बकऱ्यांचा समावेश होता. दिवसभर दिल्या जाणाऱ्या रखवालीमधील नारळ, कोंबडे आणि बकऱ्यांचा मंदिराच्या जवळच प्रसाद तयार करण्यात आला. या प्रसादासह रात्री पाण्याचा हौद फोडताना दिलेल्या बळीचा प्रसाद एकत्र करून, उशिरा हजारो भाविकांना अत्यंत शिस्तबद्ध रीतीने मटण-भाकरीचे वाटप करण्यात आले. उत्सवादरम्यान संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व कार्यक्रम शांततेत पार पडल्याबद्दल उत्सव समितीने भक्तगणांना धन्यवाद दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button