
श्रीराम नवरात्रानिमित्त ‘रामरक्षा भावार्थ’ कार्यक्रमाचे आयोजन; संस्कृत विदुषी संध्याताई सप्रे यांचे प्रबोधन
रत्नागिरी:
राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशीजी केळकर यांनी लिहिलेल्या रामायणावरील प्रवचनांच्या वाचनातून रामायणाकडे पाहण्याचा एक तार्किक दृष्टिकोन समितीच्या सेविकांना सातत्याने मिळत आला आहे. याच प्रेरणेतून, श्रीराम नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून टिळकनगर उद्यान येथे ‘श्री रामरक्षा भावार्थ सार’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहर बौद्धिक प्रमुख सौ. स्मिताताई जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व मुख्य वक्त्या सौ. संध्याताई सप्रे यांचा परिचय करून दिला. सौ. संध्याताई सप्रे या संस्कृत आणि इंग्रजी विषयातील पदव्युत्तर (एम.ए.) असून सध्या शिर्के प्रशालेत अध्यापनाचे कार्य करत आहेत.
आपल्या ओघवत्या शैलीत रामरक्षेचा भावार्थ उलगडून सांगताना संध्याताई म्हणाल्या की, “रामरक्षा हा आपल्या ऋषीमुनींनी दिलेला एक अमूल्य ठेवा आहे. हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करणे हे आपले कर्तव्य आहे.” रामनामाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, जर पूर्ण रामरक्षा म्हणणे शक्य नसेल, तर दैनंदिन कामे करताना केवळ ‘राम’ या दोन अक्षरांचा जप केला तरी जीवनात सफलता येते आणि जीवन सार्थकी लागते. हा सोपा मार्ग आपण आपल्या मुलांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. रामनामाच्या बळावर आपण जीवनरूपी भवसागर नक्कीच तरून जाऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचा समारोप दक्षिण रत्नागिरी सह-प्रचार प्रमुख कामाक्षी गद्रे यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला. शेवटी समितीची प्रार्थना आणि संपूर्ण ‘वंदे मातरम्’ होऊन सांगता झाली. या कार्यक्रमाला नागरिकांची आणि सेविकांची उत्तम उपस्थिती लाभली होती.




