श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर हिमस्खलन; ७ जणांचा मृत्यू, अनेक वाहने बर्फाखाली अडकली!


श्रीनगर-लेह या राष्ट्रीय महामार्गावर लडाखमधील झोजी ला (Zoji La) या खिंडीजवळ एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या महामार्गावर अचानक मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झालं असून अनेक वाहने यामध्ये बर्फाखाली गाडली गेली आहेत. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर हा महामार्ग तात्पुरता बंद करण्यात आला असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अनेक वाहने अडकले आहेत. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून त्या व्हिडीओत बर्फाखाली अडकलेली वाहने दिसत आहेत.

पोलिसांनी या घटनेबाबत सांगितलं की, शुक्रवारी दुपारी झोजी ला या परिसरात झालेल्या हिमस्खलनानंतर किमान १५ वाहने बर्फाखाली पूर्णपणे गाडली गेली आहेत. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलीस, लष्कर, बीआरओ, एसडीआरएफ आणि सोनमर्ग व द्रास जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच हा महामार्ग सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी या घटनेबाबत एक्सवरील पोस्ट करत म्हटलं की, “मी कारगिलचे जिल्हाधिकारी आणि एसपींना तात्काळ घटनास्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आपत्ती निवारण दल आणि बीआरओसह सर्व सरकारी यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.”
केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं की, “झोजी ला पास या ठिकाणी हिमस्खलनामुळे सात जणांचा मृत्यू झाल्याची आणि पाच जण जखमी झाल्याचं दुःखद वृत्त ऐकून अत्यंत वेदना झाल्या. शोकाकुल कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना. जखमींना सर्व आवश्यक मदत पुरवली जात आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button