
शिवसेनेच्या विरोधानंतरही बॉक्सईड वाहतूक जोमाने

खेड : मंडणगड येथील बॉक्सईड खाणीतून वाहतूक करणाऱ्या भल्या मोठ्या डंपरमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने खेड शिवसेनेच्यावतीने या वाहतुकीला विरोध केल्यानंतर ही वाहतूक बंद होण्याऐवजी अधिक जोमाने सुरू असल्याचे चित्र आहे.
भरणे खेड या रस्त्याचे सध्या काम सुरू असल्याने भरणे खेड मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते अशातच मंडणगड येथील बॉक्सईड खाणीत बॉक्सईड वाहतूक करण्याऱ्या कंपनीच्या भल्या मोठ्या डंपरमुळे खेड भरणे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते, त्यातच रस्त्याच्या कामामुळे या वाहनांमुळे लोकांच्या घरामध्ये धूळ उडत आहे. दिवसरात्र चालणाऱ्या या वाहतुकीमुळे खेडवासीयांनी अनेक तक्रारी केल्यानंतर खेड तालुका शिवसेनच्यावतीने ही वाहतूक दिवसा बंद करून रात्री १२ ते ५ या वेळेत करण्याची मागणी प्रांत अधिकारी श्रीमती वैशाली पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र या तकारारी नंतर या मार्गावरील वाहतूक दिवसरात्र बिन बोभाटपणे सुरु असल्याचे चित्र आहे.
याबाबत प्रांताधिकारी श्रीमती वैशाली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत उचित कारवाई बाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना कळविले असल्याचे सांगितले. मात्र तरीही ही वाहतूक खुलेआमपणे सुरू असल्याने खेडच्या नागरिकांना याचा नाहक मानसिक त्रास सोसावा लागत आहे.
खेड शहरातून वाहतूक बंद करावी
भरबे खेड रस्त्याचे काम सुरू असल्याने एक मार्गिका सुरू आहे. अशातच खेड शहरातून बॉक्सईड चे रिकामे डंपर भरधाव वेगाने जात असतात यामुळे एकादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खेड भरणे रस्त्याचे काम पूर्ण होई पर्यंत ही वाहतूक महाड मार्गे वळविण्याची मागणी करण्यात येणार आहे.




