शिर्सेकर दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा

गावखडी : साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याप्रमाणे असणारे रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र शिरसेकर आणि सौ. संजीवनी जितेंद्र शिर्सेकर यांनी आपला विवाह वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. थोरांचे शुभाशीर्वाद मिळावेत आणि समाजाप्रती बांधिलकी जपत १०० वृद्ध महिलांना ब्लॅंकेटचे वाटप करत मायेचा आधार दिला.


हल्ली समाजात वाढदिवस किंवा तत्सम कार्यक्रम “इव्हेंट” स्वरूपात साजरे करत त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. मात्र पैसे अशा देखाव्यासाठी वाया न जाता त्याच पैशांतून वयोवृद्धांना आधार द्यावा आणि सामाजिक बांधिलकी जपावी या हेतूने शिर्सेकर दाम्पत्याने पुढाकार घेतला. आज वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना आधार मिळावा, सन्मानाची वागणूक दिली जावी यासाठी त्यांनी आपला हा खास दिवस वृद्धांसोबत साजरा केला.


शिर्सेकर गेली अनेक वर्षे ते सामाजिक कार्य करत आहेत. समाजाच्या हितासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहे. जितेंद्र शिर्सेकर यांनी गेली पाच वर्षे शिवार आंबेरे सरपंच म्हणून कार्यभार सांभाळला आहे. तसेच उपसरपंच म्हणून दहा वर्षे, ग्रामपंचायत सदस्य म्हणून दहा वर्षे, त्याचप्रमाणे पत्नी सौ. संजीवनी शिर्सेकर यांनीही दहा वर्षे शिवार आंबेरे सरपंच पद सांभाळले आहे. आज त्यांनी आपल्या लग्नाचा २५ वा वाढदिवस एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करून समाजापुढे एक नवीन आदर्श उभा केला आहे, त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. याप्रसंगी शिवार आंबेरे पोलीस पाटील सुरेश लक्ष्मण नाटेकर, गोपाळ रोकडे, दयानंद लाखण, राम गुरव आणि महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button