शिक्षक हे विद्यार्थ्याचे आदर्श असतात : सौ. दाक्षायणी बोपर्डीकर

शासकीय अध्यापक महाविद्यालयात गुणवंत शिक्षकांना पुरस्कार वितरण.... विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धा व निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण

रत्नागिरी दि.१: बीएडमध्ये शिकताना जे शिकवले जाते ते शिक्षक म्हणून काम करताना आचरणात आणावे शिक्षक म्हणून वर्गात जाताना पूर्ण तयारी करून जाणे गरजेचे आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्याना मार्ग दाखवणारे बनावे. आपली आई ही आपली पहिली गुरु असते. शिक्षक हे विद्यार्थ्याचे आदर्श असतात असे प्रतिपादन दी न्यू सोसायटीच्या कार्याध्यक्षा व फाटक हायस्कूलच्या माजी पर्यवेक्षिका सौ. दाक्षायणी बोपर्डीकर यांनी केले. त्या शासकीय अध्यापक महाविद्यालयात शुक्रवारी आयोजित माजी विद्यार्थी मंडळाच्या गुणवंत शिक्षकांच्या पुरस्कार वितरण व बक्षीस वितरण समारंभात बोलत होत्या.

यावेळी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. राजश्री देशपांडे, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, खजिनदार विजय वाघमारे, सल्लागार विनायक हातखंबकर, बीएड काॅलेजचे समन्वयक डाॅ.चरणदास कांबळे, डाॅ. अस्मिता मजगांवकर, सदस्य रवींद्र पाटणकर, रजनी पेजे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव गणपती एडवी यांनी केले. पाहुण्याचा परिचय सल्लागार विनायक हातखंबकर यांनी करुन दिला.

गुणवंत शिक्षक सौ. संजना तारी, सौ. दामिनी भिंगार्डे, जयेश गुरव, विजय बसवंत यांना पुरस्कार देण्यात आले. यानंतर वैयक्तिक व सांघिक क्रीडा स्पर्धा, निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी व स्पर्धेतील स्पर्धकांनी मनोगते व्यक्त केली. महाविद्यालयाच्या प्राचार्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डाॅ. राजश्री देशपांडे यांनी अध्यक्षीय मनोगतातून माजी विद्यार्थी मंडळाचे उपक्रम प्रेरणा देणारे आहेत त्यांच्या सर्व उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार यांनी चांगल्या सहकार्याबद्दल माध्यमिक शिक्षण विभागाचे, क्रीडा स्पर्धेसाठी पटवर्धन हायस्कूल चे मैदान दिल्याबद्दल भारत शिक्षण मंडळाचे, चंपक मैदान दिल्याबद्दल रत्नागिरी नगर परिषदेचे , प्रमाणपत्र लेखनासाठी सहकार्याबद्दल कृ. चि.आगाशे शाळेतील शिक्षकांचे विशेष आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदस्य रवींद्र पाटणकर यांनी केले. शेवटी खजिनदार विजय वाघमारे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सल्लागार विनायक हातखंबकर,सचिव गणपती एडवी, खजिनदार विजय वाघमारे, समन्वयक डॉ चरणदास कांबळे यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button