शालेय विद्यार्थ्यांनी साकारली टाकाऊ वस्तूमधून ‘कोलाज’ कलासृष्टी

खेड : शालेय विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी आणि त्यांना निसर्गाच्या सानिध्यात कलेचा आनंद घेता यावा, या उद्देशाने येथील श्रीमान चंदूलालशेठ हायस्कूल येथे एका अनोख्या कला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे निसर्गाच्या खुल्या वातावरणात मांडलेली विद्यार्थ्यांची सृजनशीलता.
या प्रदर्शनात इयत्ता पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. केवळ कागदाचा वापर न करता, विद्यार्थ्यांनी कापडाचे रंगीत तुकडे, जुने पेपर्स आणि विविध टाकाऊ वस्तूंना एकत्र करून अतिशय मोहक अशा ‘कोलाज’ कलाकृती साकारल्या आहेत. टाकाऊ वस्तूंमधून इतक्या सुंदर रचना केल्या जाऊ शकतात, याचा उत्तम नमुना विद्यार्थ्यांनी सादर केला आहे. हे प्रदर्शन सर्व विद्यार्थी, पालक आणि रसिक प्रेक्षकांसाठी २० मार्चपर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत पाहण्यासाठी खुले राहणार आहे.
या संपूर्ण उपक्रमात शाळेचे कला शिक्षक राकेश देवरुखकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या कलाकृतींना अंतिम स्वरूप दिले आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रशालेचे चेअरमन राजेश बुटाला, संस्थेचे संचालक संजय बुटाला, प्रभारी मुख्याध्यापक विजय मस्के, पर्यवेक्षक यु. जी. कांबळे, कलाशिक्षक राकेश देवरुखकर, नगरसेविका सौ. हेमा खेडेकर व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
निसर्गाच्या सानिध्यात ‘शैक्षणिक कट्टा’
साधारणपणे भिंतींच्या आड भरणारी प्रदर्शने यावेळेस चक्क शाळेच्या मैदानावरील ‘शैक्षणिक कट्टा’ येथे भरवण्यात आली आहेत. निसर्गाच्या खुल्या वातावरणात विद्यार्थ्यांनी या कलाकृती पाहाव्यात आणि त्यातून प्रेरणा घ्यावी, हा यामागचा मुख्य हेतू आहे.

याप्रसंगी या प्रदर्शनातून पाच उत्कृष्ट चित्रे रेखाटलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. दरम्यान, जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक करावे, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button