शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश

इंडियन बँकिंग पर्सोनल सिलेक्शन या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या भारतातील नामांकित राष्ट्रीयकृत बँकामधील उच्च श्रेणी पदांच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवलीमधील ८ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मोठ्या पदांना गवसणी घातली.
यामध्ये प्रणोद धुमाळ व तेजस पावले यांची बँक ऑफ इंडियामध्ये कस्टमर सर्व्हिस असोसिएट म्हणून निवड झाली. केशव मकर याची नैनिताल बँकेमध्ये कृषी प्रक्षेत्र अधिकारी वर्ग १ पदी निवड झाली. सूरज दहिफळे याने दुहेरी यश संपादन करत कर्नाटक ग्रामीण बँकेमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर व बँक ऑफ इंडियामध्ये कस्टमर सर्व्हिस असोसिएट ही पदे पटकावली. तसेच मानसी पाटील, पार्थ पवार, अक्षता मालेदार यांची युनियन बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक या पदावर निवड झाली. आकांक्षा केसरे हिची फेडरल बँकेमध्ये निवड झाली आहे.
सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनीतकुमार पाटील यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हे सर्व विद्यार्थी देशातील विविध भागामध्ये आपली सेवा देणार असून हे यश महाविद्यालयाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा ठरणार आहे. महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button