व्यावसायिक गॅसचा तुटवडा; खेडमधील नामांकित हॉटेलमध्ये पेटली चुल

खेड : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायिक अडचणीत सापडले असून त्यांना रोजच्या व्यवसायासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात असणाऱ्या एका नामांकित हॉटेल व्यवसायिकाने तर या समस्येवर मात करण्यासाठी आपल्या हॉटेलमध्ये चक्क पारंपरिक चुल पेटवून स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या व्यावसायिक वापरासाठी लागणारे गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल चालकांची मोठी गैरसोय होत आहे. रोजच्या ग्राहकांसाठी जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था सुरळीत ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे काही हॉटेल चालक पर्यायी उपायांचा अवलंब करताना दिसत आहेत. खेड शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरची कमतरता भासू लागल्याने मालकाने पारंपरिक पद्धतीचा आधार घेत चुलीवर स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या घटनेची शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून घरगुती गॅस सिलेंडरचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी नागरिक मोठ्या प्रमाणात गॅस एजन्सीवर गर्दी करताना दिसत आहेत. भविष्यात गॅसचा तुटवडा अधिक वाढेल या भीतीने अनेक जण आगाऊ सिलेंडर घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सध्या राज्यात लग्नसराईचा हंगामही सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वयंपाकाची व्यवस्था केली जाते. मात्र गॅस सिलेंडरची कमतरता भासू लागल्यास लग्न समारंभाच्या कार्यक्रमांनाही याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिक आणि हॉटेल व्यवसायिक यांच्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button