वरवडे गावच्या सुपुत्राचे राष्ट्रीय स्तरावर सुवर्णयश

राष्ट्रीय न्यायशास्त्र स्पर्धेत वेद जोशी यांना न्याय शलाका सुवर्ण पदक

रलागिरी

तालुक्यातील वरवडे (वरचे) गावचे सुपुत्र वेद अर्पिता अश्विनीकुमार जोशी यांनी संस्कृत व न्यायशास्त्र क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.

वेद जोशी यांनी २०२०- २१ या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होत विशेष प्राविण्य मिळवले होते. विशेष म्हणजे संस्कृत विषयात त्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. त्यानंतर त्यांनी संस्कृतचे सखोल शिक्षण घेण्यासाठी गोवा राज्यातील काणकोण येथे टेंगसे गुरुजी यांच्या वागवर्धिनी पाठशाळेत प्रवेश घेतला असून सध्या तेथे न्यायशास्त्राचे अध्ययन करत आहेत.

याच शिक्षणाच्या बळावर त्यांनी २०२४ साली काशी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत साहित्य शाखेत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक, प्रशस्तीपत्र आणि २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले होते.

दरम्यान, यावर्षीही राष्ट्रीय संस्कृत संस्थानतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील न्यायशास्त्रातील ‘सव्याभिचार’ ग्रंथावर आधारित न्याय शलाका स्पर्धेत वेद जोशी यांनी पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना न्याय शलाका सुवर्ण पदक, प्रशस्तीपत्र आणि २५ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार कांची येथे श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती विश्वविद्यालायात भारताचे शंकराचार्य वजयेंद्र सरस्वती स्वामीजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या स्पर्धेत देशभरातून सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अंदाजे ३० ते ३२ विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी सहा स्पर्धांमधून वेद जोशी यांनी प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली.

वेद जोशी यांच्या या यशाबद्दल वरखडे गावासह संपूर्ण परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button