लोटे औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान केमिकल कंपनीत भीषण स्फोट; ९ कामगार जखमी!

Lote : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या डॉ. खान केमिकल या कंपनीत शुक्रवारी दुपारी सुमारे २ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात कंपनीतील एकूण ९ कामगार जखमी झाले असून जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या स्फोटात नंदकिशोर राणे आणि रणजीत राणे (रा. दाभील), सुजन दास (रा. आवाशी), बिपिन मोरे (रा. शिरळ, चिपळूण), शिवानंद खोंडे (मुळगाव अहमदपूर, जि. लातूर, सध्या वास्तव्य घाणेखुंट), रघुनाथ खामकर (रा. मुरडे, खेड), असद खान (रा. घाणेखुंट), अरमान शहा (रा. घाणेखुंट) आणि समीर शेख (मुळगाव अहमदपूर, जि. लातूर, सध्या वास्तव्य घाणेखुंट) हे कामगार जखमी झाले आहेत.

स्फोटानंतर जखमी कामगारांना तातडीने उपचारासाठी कंपनीच्या खाजगी वाहनांद्वारे विविध रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी नंदकिशोर राणे, रणजीत राणे, सुजन दास आणि बिपिन मोरे या जखमींना चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर शिवानंद खोंडे, रघुनाथ खामकर, असद खान, अरमान शहा आणि समीर शेख यांना घाणेखुंट येथील परशुराम रुग्णालयात कंपनीच्या वाहनातून दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच लवेलचे मंडल अधिकारी एडगे यांनीही घटनास्थळी भेट दिली. या घटनेबाबत कंपनी व्यवस्थापनाकडून औद्योगिक सुरक्षा विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button