
लोटे एमआयडीसीत लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात जनआक्रोश सुरूच, प्रशासनाचे दुर्लक्ष
खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता ६३ दिवस पूर्ण झाले असून, या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. इटलीतून आयात करण्यात आलेल्या पीफास या मानव आरोग्यास घातक मानल्या जाणार्या रासायनिक उत्पादनाला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध दर्शविला आहे.
कोकण नागरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या बेमुदत आंदोलनात पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. स्थानिकांच्या मते, लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत तयार होणारे किंवा वापरले जाणारे रसायन पर्यावरणासाठी तसेच मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकते. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात नागरिकांनी ठाम भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ६ एप्रिल रोजी कंपनीविरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात केवळ लोटे परिसरच नव्हे, तर संपूर्ण कोकणातून हजारो नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. या आंदोलनाला आता जनआक्रोश समितीनेही जाहीर पाठिंबा दिला असून, त्यामुळे आंदोलन अधिक व्याबक होण्याची चिन्हे दिसत आहेत.www.konkantoday.com



