रोटरी प्रतिष्ठान प्रकरणी खेडमध्ये जंगम यांचे लाक्षणिक उपोषण स्थगित !

१५ एप्रिलपर्यंत कारवाईचे प्रशासनाचे पत्र; १६ एप्रिल रोजी पुन्हा उपोषणाचा इशारा

खेड : येथील रोटरी प्रतिष्ठान संस्थेच्या बांधकाम प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सदानंद महादलिंग जंगम यांनी सुरू केलेले लक्षवेधी उपोषण सध्या स्थगित करण्यात आले आहे. प्रशासनाकडून १५ एप्रिलपर्यंत कारवाई करण्यात येईल, असे लेखी पत्र देण्यात आल्यामुळे जंगम यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
खेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर (अनिकेत शॉपिंग सेंटरसमोरील पटांगण) हे लक्षवेधी उपोषण सुरू करण्यात आले होते. रोटरी प्रतिष्ठान संस्थेला देण्यात आलेल्या बांधकाम परवानगीतील अटी व नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप जंगम यांनी केला होता. तसेच संबंधित आदेश रद्द करून जबाबदार अधिकारी व संस्थाचालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान प्रशासनाने या प्रकरणात १५ एप्रिलपर्यंत आवश्यक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने सध्या उपोषण स्थगित करण्यात आले आहे. मात्र दिलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास १६ एप्रिल रोजी त्याच ठिकाणी पुन्हा उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्ते सदानंद जंगम यांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे खेड तालुक्यात रोटरी प्रतिष्ठानच्या बांधकामाविषयी चर्चेला उधाण आले असून प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button