
राम जन्मला ग…. सखी राम जन्मला !

रत्नागिरी : राम जन्मला ग…. सखी राम जन्मला…!! च्या घोषात हजारो भक्तांच्या उपस्थितीत आज (२६ मार्च) शहरासह जिल्हाभरात रामनवमीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरात नाक्यावरील राम मंदिरात जन्मोत्सव आणि नगर प्रदक्षिणा असा कार्यक्रम झाला. सायंकाळी नगर प्रदक्षिणेत प्रभू श्रीरामाचा रथ, हनुमानाचा रथ, ढोल-ताशा पथक आणि श्रीराम जीवनावरील सजीव देखावे सहभागी झाले होते.
सायंकाळी निघालेल्या रथयात्रेचे राधाकृष्ण नाका, धनजीनाका, मच्छीमार्केट परिसर, झारणी रोड आदी परिसरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्रीराम मंदिरात गुढीपाडव्यापासून श्रीराम नवमी उत्सवाला प्रारंभ झाला.

आज सकाळी नगारा- चौघडा वादन, प्रभू श्रीरामचंद्रांची षोडशोपचारपूर्वक पूजा, अभिषेक करण्यात आला. छप्पन भोग अर्पण आणि महाआरती झाल्यानंतर मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. दिवसभर मंदिरात रत्नागिरी आणि परिसरातील नामवंत भजनी मंडळींनी भजनसेवा श्रीराम चरणी रूजू केली.

दुपारी १२ वाजता जन्मोत्सवाचे कीर्तन झाले. जन्मोत्सव झाल्यानंतर सुंठवडा आणि बुंदीच्या लाडवाचा प्रसाद देण्यात आला. बाळ रामाच्या मूर्तीला पाळण्यामध्ये घालण्यात आले व पाळणा जोजवला.
सायंकाळी मंदिरातून श्रीरामचंद्रांचा रथ नगर प्रदक्षिणेसाठी वाजतगाजत निघाला. या रथासोबत ढोल- ताशांची पथके होती. तसेच प्रभू श्रीरामाच्या जीवनावर आधारीत सजीव देखावे बालदोस्तांनी साकारले. यामध्ये जटायू पक्षासोबत श्रीराम, पर्णकुटीमध्ये सीता- राम, हनुमानासमवेत रामसीता, शबरी सोबत राम-लक्ष्मण यांचा समावेश होता. उद्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून श्रीराम मंदिर संस्थेने भाविकांना महाप्रसादासाठी येण्याचे आवाहन केले आहे.




