राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या मिनार पाटील याला अभिनयाचे प्रथम पारितोषिक

रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपन्न झालेल्या अखिल भारतीय राज्य नाट्य स्पर्धेत समर्थ रंगभूमी रत्नागिरी यांनी सादर केलेले आणि प्र. ल. मयेकर लिखित अग्निपंख या नाटकातील रत्नागिरीचा सुपुत्र तथा नवोदित अभिनेता मिनार गजानन पाटील यांना उत्कृष्ट अभिनयाचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक (रौप्यपदक) प्राप्त झाले आहे.
राज्य शासनाच्या वतीने जिल्हा स्तरावर नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या स्पर्धेतही मिनार गजानन पाटील यांनी व समर्थ रंगभूमीच्या त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याने, अनेक बक्षीस पटकावत रत्नागिरी जिल्ह्यात या नाटकाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. म्हणून दिग्दर्शक ओंकार पाटील याचे सर्वच नाट्यप्रेमींनी कौतुक केले होते. त्यामुळे या नाटकाची राज्य नाट्य स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्या स्पर्धेत अग्निपंख नाटकातील महत्वाची भूमिका असलेल्या मिनार गजानन पाटील यांनी केलेला उत्कृष्ट अभिनय हा परीक्षकांच्या पसंतीस आल्याने मिनार गजानन पाटील यांना अभिनयाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.
मिनार गजानन पाटील हे मागील अनेक वर्षे अभिनय क्षेत्रात अत्यंत लक्षणीय कामगिरी करत असून, त्यांनी यापुर्वी अनेक नाटके व टीव्हीवरील मराठी मालिकांत महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांच्या याच दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, शासनाच्या अत्यंत महत्वाच्या राज्य स्पर्धेतील त्यांनी मिळविलेले हे यश लक्षणीय व कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया नाट्य रसिकांनी दिली असून, सर्वच स्तरातून त्याचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
मात्र या नाट्यस्पर्धेत राज्यभरातील तब्बल ४७ संघ दाखल झाले होते. त्यामध्ये सर्वच नाटकांनी सादरीकरण केले होते. पैकी रत्नागिरी जिल्हा स्तरांवर झालेल्या स्पर्धेत अग्निपंख या नाटकाने सर्वच क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केली होती. म्हणून राज्य स्पर्धेसाठी रसिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. म्हणून हे नाटक राज्य स्पर्धेसाठी अतिशय दर्जेदार पद्धतीने सादर करण्यात आले होते. परिणामी या नाटकाला रत्नागिरीकरांनी अतिशय उत्तम दाद देत कौतुक केले होते. आणि राज्य स्पर्धेत या नाटकाला अनेक बक्षिसे मिळतील ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र आज जाहीर झालेला निकाल पाहता, परीक्षकांनी केलेल्या परिक्षणांतील उत्कृष्ट अभिनय वगळता इतर निकाल पाहून रत्नागिरीवासीयांचा भ्रमनिरास झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button