राज्यावर पुन्हा अवकाळी संकट! 4 एप्रिलपर्यंत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन!


मुंबई : राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद झाली असतानाच आज, ३० मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आज प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातदेखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो, असे कृषी विभागाने रविवारी सांगितले.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘राज्यात ३० मार्चच्या तुलनेत ३१ मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर १ ते ४ एप्रिलदरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील ठिकठिकाणी आभाळी हवामान, दुपारनंतरचा वादळी पाऊस, आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही’, असे त्यांनी म्हटले आहे.

‘शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी’, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जनावरांचीही काळजी घ्यावी
‘मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, पत्र्याच्या निवाऱ्याखाली तसेच विद्युत ट्रान्स्फॉर्मर, विजेचे खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे’, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button