
राजिवडा येथील पुलाखाली मैत्रिणीला भेटण्याच्या कारणावरून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला, चार संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल
मैत्रिणीला भेटण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून राजीवडा पुलाखाली एका तरुणावर चौघांनी मिळून जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. ही घटना गुरुवार, २६ मार्च रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
रमजान नवाज मिरकर, साजिद बाबा मिरकर, अझरुद्दीन अलीमिया मुजावर आणि महम्मद बावा मिरकर (सर्व रा. राजीवडा पुलाखाली, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अरमान नझीर होडेकर (वय २९, रा. राजीवडा पुलाखाली) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि संशयित एकमेकांच्या ओळखीचे आहेत. रमजान मिरकर याची मैत्रीण अफरीन बली ही जैतापूर येथे राहते आणि ती फिर्यादी अरमान होडेकरचीही मैत्रीण आहे. अरमान हा अफरीनला भेटण्यासाठी गेला असता, तिने रमजानचे काही साहित्य त्याच्यामार्फत पाठवले होते.
याच कारणावरून रमजान मिरकर याने गैरसमज करून घेत अरमानसोबत वाद घातला. वाद वाढताच अन्य तिघे संशयित घटनास्थळी आले आणि सर्वांनी मिळून अरमानला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉडने मारहाण केली. या घटनेनंतर जखमी अरमानने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.www.konkantoday.com




