राजापूर तालुका धनगर समाज संस्थेच्या वतीने स्नेहमेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

राजापूरः राजापूर तालुका धनगर समाज संस्थेच्या वतीने समाजातील बंधू-भगिनींना एकत्र आणण्यासाठी आणि पारंपारिक संस्कृतीचा गौरव करण्यासाठी स्नेहमेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाळ मातीशी, अन् जमातीशी या भावनेतून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम रविवारी २२ मार्च रोजी सायंकाळी ४ ते ९ या वेळेत दादर मुंबई येथील रेल्वे इन्स्टिट्यूटच्या मुख्य हॉलमध्ये होणार आहे.

या स्नेहमेळाव्याला राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक आ. किरण सामंत तसेच आ. गोपीचंद पडळकर, आ. सदाभाऊ खोत, माजी आमदार राजन साळवी, समाजनेते राजू जांगळे, समाजसेवक अशोक जंगले आदि उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या उपस्थितीत समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात येणार असून पाच वाजता पारंपारिक गजानृत्य, मंगळागौर व फुगडी नृत्य, हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून महिलांना एकत्र येण्याची व पारंपारिक संस्कृती जपली जाणार आहे. सायंकाळी सहा वाजता सामाजिक आशय असलेली नाटिका सादर होईल. ७ वाजता धनगरी पारंपारिक वेशभूषेचे

सादरीकरण, धनगर समाजातील गुणवंत व्यक्तींचा, यशवंतांचा गुणगौरव तसेच रात्री आठ वाजता प्रमुख अतिथींचा सत्कार सोहोळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला लकी ड्रॉ. रात्री साडे आठ वाजता होणाऱ्या या सोडतीत विजेत्या महिलेला पैठणी साडी बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. ९ वाजता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन राजापूर तालुका धनगर समाज संस्थेच्या कार्यकारिणीने केले आहे. संस्थेचे अध्यक्ष तुकाराम उर्फ दादा येडगे यांच्या नेतृत्वाखाली सचिव झोरे, खजिनदार संताष बावदाणे, उपाध्यक्ष सुरेश शिंदे, कार्याध्यक्ष हरेश कोकरे, सहसचिव गणपत वरक, सहखजिनदार विश्वनाथ कोकरे, प्रवक्ते रामचंद्र जांगळे, सचिन गजरे, सल्लागार अनंत शिंदे, मंगेश येडगे आदि कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.

समाजातील ऐक्य परंपरा व समाजातील बांधिलकी मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमेळाव्याला राजापूर तालुक्यातील तसेच मुंबई परिसरातील धनगर समाजातील बांधव-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राजापूर तालुका धनगर समाज संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button