
राजापूर ग्रामीण रूग्णालयामध्ये क्यूआर स्कॅन करून रुग्णालयात नोंदणी
आरोग्य विभागाने सर्व सरकारी रुग्णालयात क्यूआर कोड स्कॅन करून ओपीडीचा नंबर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची राजापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये अंमलबजावणी सुरू झाली आहे. या डिजिटल सुविधेमुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आता ओपीडीचा नंबर काढण्यासाठी सरकारी रुग्णालयात ताटकळत रांगेत थांबावे लागणार नाही. या सुविधेमुळे वृद्ध, दिव्यांग, लहान मुलांसह रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही वर्षात शासनाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यावर भर दिला आहे. जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रूग्णालये, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय यंत्रणा, तज्ज्ञ डॉ क्टर, तपासणी सुविधा आणि औषधसाठा यामध्ये वाढ केली आहे. त्यामुळे अनेक रुग्ण आता मोफत किंवा अल्पदरात उपलब्ध असलेल्या शासकीय उपचारांचा लाभ घेण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र, रुग्णसंख्या वाढल्याने सरकारी रुग्णालयामध्ये ओपीडीसाठी गर्दी होते. त्यातून ओपीडीसाठी नंबर लावण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रांगेत उभे राहावे लागते.
त्यामध्ये विशेषतः वृद्ध, दिव्यांग आणि लहान मुलांसह आलेल्या पालकांना विशेषतः त्रास सहन करावा लागतो काही वेळा केवळ नंबर लावण्यासाठीच तासनतास वाया जात असल्याने नागरिकांत नाराजीही व्यक्त होते. या सार्याचा विचार करून आरोग्य विभागाने ओपीडीसाठी नंबर लावण्यासाठी डिजिटल सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची शासकीय रुग्णालयांमध्ये अंमलबजावणीही सुरू झाली आहे.www.konkantoday.com




