रस्त्यावर मासेविक्री करणाऱ्यांवर आता थेट गुन्हे नोंदणार राजापूर न.प.चा आरोग्य विभाग

राजापूरः प्रशासकीय कालावधी संपून नवे सभागृह अस्तित्वात येताच राजापूर नगर परिषदेतील सदस्यांनी आता अॅक्शन मोड घेतला आहे. त्यांच्या सूचनेनूसार शहरात रस्त्यावर बेकायदा व अनधिकृतपणे मासे विक्री करून शहराच्या स्वच्छतेत बाधा आणणाऱ्या महिला विक्रेत्यांबद्दल आरोग्य विभागाने कडक पावले उचलली आहेत. याबाबतीतील कारवाईसाठी न.प.च्या आरोग्य विभागाने स्वच्छता विभागातील मुकादम राजन रामचंद्र जाधव यांना प्राधिकृत केले आहे. श्री. जाधव यांनी पोलिस स्थानकाला पत्र दिले असून पोलिस यंत्रणा हा विषय कितपत गांभीर्याने घेते यावर या समस्येची उकल अवलंबून आहे.

राजापूर नगरपरिषद हद्दीतील न.प. च्या कार्यालयीन इमारतीमागेल लागूनच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर मासे विक्री करणारा तालुक्यातील महिलावर्ग मोठया प्रमाणामध्ये जबरदस्ती व न.प.ला न जुमानता मासेविक्री करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. दुर्गंधी पसरते तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर, हॉटेलसमोर या मासे विक्री करणा-या महिला बसतात. त्यामुळे व्यापा-यांच्या तसेच नागरीकांच्या तक्रारी कार्यालयामध्ये वारंवार येत असतात. नगरपरिषद कर्मचा-यांकडून या मासे विक्री करणा-या महिलांवर वेळोवेळी मासे जप्त करणे, ज्याठिकाणी मासे विक्रीसाठी बसतात त्या ठिकाणावरून त्यांना उठविणे व मासेविक्री करू न देणे अशा पध्दतीने नगरपरिषद स्वच्छता विभागामार्फत कारवाई करण्यात येत असते. मात्र या मासेविक्री करणा-या महिलांकडून कारवाई करणा-या नगरपरिषद कर्मचा-यांच्या अंगावर माशाचे पाणी उडविण्यासारखे प्रकार वारंवार होत आहेत. परंतू या कारवाईला न जुमानता या मासे विक्री करणा-या महिला दुसऱ्या दिवशी त्याचठिकाणी मासे विक्री करतात. त्यामुळे वारंवार नागरीकांच्या व व्यापा-यांच्या तक्रारींना सामोरे जावे लागते व नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या अवैध मासेविक्री करणा-या महिलांवर महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५चे कलम २६७व २६९नूसार भंग केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असे थेट पत्रच न.प.च्या वतीने देण्यात आलेले आहे. स्थानिक पोलिस यंत्रणेच्या प्रतिसादावर पुढील धोरण आणि भूमिका ठरवण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button