
रत्नागिरी पालिकेच्या कारवाईने थकबाकीदारांचे धाबे दणाणले
जप्ती पथकाकडून ७३ मालमत्ता सील, ६१ नळ कनेक्शन खंडित
रत्नागिरी : वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या शहरातील थकबाकीदारांविरुद्ध घरपट्टी आणि कर वसुलीसाठी रत्नागिरी नगरपालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली जप्ती पथकाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. या धडक मोहिमेमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल ७३ मालमत्तांना टाळे ठोकून त्या सील करण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर, घरपट्टी थकवणाऱ्या ६१ मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले असून संबंधित धारकांना कडक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ज्यांची घरपट्टी येणे बाकी आहे, त्यांचे नळ कनेक्शन कापण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
आर्थिक वर्षाचा शेवट जवळ येत असल्याने जास्तीत जास्त कर संकलित करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मालमत्ताधारकांच्या सोयीसाठी आणि कर भरणा सुलभ व्हावा यासाठी २१, २२, २६, २८, २९ आणि ३१ मार्च या सुटीच्या दिवशीही नगर परिषदेचे कार्यालय सुरू ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी वेळेत कर भरून कटू कारवाई टाळावी, असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे.
सध्या पालिकेसमोर एकूण १५ कोटी ८७ लाख ५० हजार ६४८ रुपयांची मागणी (डिमांड) आहे. त्यापैकी आतापर्यंत १० कोटी ३१ लाख १३ हजार ०६१ रुपयांची वसुली पूर्ण झाली आहे. एकूण वसुलीची टक्केवारी ६५ टक्के इतकी झाली असून, उर्वरित ३५ टक्के वसुली पूर्ण करण्यासाठी जप्ती पथक शहरात ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहे.




