
रत्नागिरी जिल्ह्यात मत्स्य दुष्काळ जाहीर करा, मच्छिमारांना तातडीची मदत द्या, संघटनेची मागणी
रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छिमारांवर आर्थिक संकट कोसळले असून, यंदाचा मासेमारी हंगाम अत्यंत तोट्याचा ठरला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ’मत्स्य दुष्काळ’ जाहीर करून मच्छिमारांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी रत्नागिरी मच्छिमार खलाशी आणि कामगार कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष समीर वस्ता यांनी नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. संघटनेच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, यंदाच्या मोसमात समुद्रात खर्चाच्या तुलनेत अत्यल्प मासळी मिळत आहे. हवामानातील बदलामुळे माशांचे स्थलांतर झाले असून, नौकांना अपेक्षित प्रमाणात मासळी मिळत नाही. त्यातच वाढलेले डिझेल दर आणि खलाशांचा खर्च यामुळे नौका मालक व मच्छिमार कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. ही परिस्थिती मच्छिमार समाजासाठी दुष्काळासमान असल्याचे सांगत, तातडीने शासकीय मदतीची गरज असल्याचे संघटनेने अधोरेखित केले आहे.
मच्छिमारांना विशेष आर्थिक सहाय्य जाहीर करणे, डिझेलवर अनुदान किंवा सवलत देणे, तसेच विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, मत्स्य व्यवसायासाठी घेतलेल्या बँक कर्जाच्या हप्त्यांवर सवलत देणे आणि व्याजदर कमी करणे, अशा उपाययोजनाही तातडीने राबवाव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. या मागण्यांमुळे संकटात सापडलेल्या मच्छिमारांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
www.konkantoday.com




