रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व

अस्मिता केंद्रे अध्यक्ष, तर विलास चाळके उपाध्यक्षपदी बिनविरोध

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणुकीत अध्यक्षपदी मंडणगड तालुक्यातील अनुभवी सदस्या अस्मिता केंद्रे यांची, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


जिल्हा परिषदेच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात आज ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भाऊसाहेब गलांडे यांनी काम पाहिले.


सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. दुपारी १ वाजता विहीत वेळेत अध्यक्षपदासाठी अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्षपदासाठी विलास चाळके यांचेच एकमेव अर्ज दाखल झाले. दुपारी ३ वाजता अर्जांची छाननी आणि अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया झाली. दोन्ही अर्ज वैध ठरले आणि विरोधात कोणीही नसल्याने निवडणूक बिनविरोध झाली. दुपारी ३.३० वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.
नूतन अध्यक्ष अस्मिता केंद्रे या मंडणगड तालुक्यातील अनुभवी सदस्य आहेत, तर उपाध्यक्षपदी निवड झालेले विलास चाळके यांचा दांडगा प्रशासकीय व राजकीय अनुभव आहे. चाळके यांनी यापूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिले असून, जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि अर्थ सभापती म्हणूनही त्यांनी यशस्वी कारकीर्द भूषविली आहे.
या निवडीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, जिल्ह्याच्या विकासाला आता अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना श्रीमती केंद्रे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीटंचाईवर आणि आरोग्या बाबतीत असलेल्या समस्यांचा आढावा घेऊन लवकरच त्यावर काम करणार असल्याचे स्पष्ट करतानाच जिल्ह्यातील रस्ते आणि विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद देऊन माझ्याबरोबरच मंडणगड तालुक्याचाही सन्मान केला असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
उपाध्यक्ष श्री. चाळके यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, राज्यमंत्री योगेश कदम यांचे आभार मानतानाच विकास कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही दिली. तसेच सर्व सदस्यांना एकत्र घेऊन ग्रामीण भागाचा आणि जिल्ह्याचा विकास करणार असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button