
रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर तक्रार
रत्नागिरी: शहरातील लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून रॅगिंगचा एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ‘कॉमन ऑफ’ घेण्यासाठी ८ विद्यार्थ्यांनी मिळून ३ विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तीन विद्यार्थी या महाविद्यालयातील एफ.वाय. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागात शिक्षण घेत आहेत. याच विभागातील अन्य ८ विद्यार्थ्यांनी ‘कॉमन ऑफ’ घेण्यासाठी या तीन विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली.
पीडित विद्यार्थ्यांनी या मनमानीला विरोध केला असता, संबंधित ८ विद्यार्थ्यांनी एकजूट करून त्यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. यामध्ये केवळ दबावच नाही, तर वारंवार शिवीगाळ, धमक्या आणि विनाकारण वाद घालण्याचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या सततच्या त्रासामुळे आपण प्रचंड मानसिक तणावाखाली असून, महाविद्यालयात असुरक्षित वाटत असल्याचे पीडित विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात प्रशासनासमोर मांडले आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून पीडित विद्यार्थ्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे धाव घेऊन रीतसर निवेदन दिले आहे. या तक्रार अर्जात ८ विद्यार्थ्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
”काही विद्यार्थी एकत्र येऊन मनमानी करतात आणि आम्हाला धमक्या देतात. यामुळे आमच्या शैक्षणिक वातावरणावर परिणाम होत असून आम्हाला भीती वाटत आहे,” असे पीडित विद्यार्थ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.




