
रत्नागिरीत चर्मालय-कोकण नगर मार्गावरील अतिक्रमणांवर ६ मार्चपासून पुन्हा कारवाई
रत्नागिरी शहरातील चर्मालय ते कोकणनगर मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेली अद्याप स्वतःहून न काढलेली बेकायदेशीर बांधकामे शुक्रवार, दि. ६ मार्चपासून हटविण्यात येणार आहेत.
रत्नागिरी नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विमानतळ विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त कारवाईतून गेल्या महिन्यात या मार्गावरील सुमारे २५ ते ३० टक्के अतिक्रमणे जेसीबीच्या मदतीने पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आली होती.
उर्वरित अतिक्रमणे संबंधित मालक स्वतःहून काढून घेतील, असे आश्वासन दिल्याने ही अतिक्रमण हटाव मोहीम काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. मात्र महिना उलटूनही अतिक्रमणे हटवली गेली नसल्याने प्रशासनाने पुन्हा कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी नगर परिषदेकडून ६ मार्च रोजी पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. ही अतिक्रमण हटाव मोहीम पूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची असून सणासुदीचे दिवस आणि नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी ही कारवाई काही काळ स्थगित करण्यात आली होती.
आता शुक्रवार, दि. ६ मार्चपासून ही मोहीम पुन्हा सुरू होणार असून यावेळी कोणतीही विनंती ऐकली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.




