
रत्नागिरीत घुमणार शिवपराक्रमाचा विररस! कवी भूषण यांच्या लेखणीतून उलगडणार महाराजांचा जाज्वल्य इतिहास
➡️ रत्नागिरी :
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव प्रत्येक मराठी माणसाच्या श्वासात आहे. पण महाराजांची हिंदवी स्वराज्याची पताका आणि त्यांचा वैभवशाली पराक्रम संपूर्ण हिंदुस्थानभर पोचविण्याचे महान कार्य उत्तर भारतातील कवी भूषण यांनी केले. याच अजोड काव्यावर आधारित ‘शिवराज भूषण’ हे महानाट्य आता रत्नागिरीकरांना अनुभवता येणार आहे.
श्री शिवराज मंच, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित हे महानाट्य येत्या २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे सादर होणार आहे.
◾ कोण होते कवी भूषण?
उत्तर प्रदेशातील कानपूर जवळील त्रिविक्रमपूर या छोट्या गावातून आलेले कवी भूषण महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा ऐकून १६७१ मध्ये थेट दुर्गराज रायगड किल्ल्यावर पोहोचले. आपल्या अफाट प्रतिभेने त्यांनी महाराजांच्या ‘राजकवी’चा दर्जा मिळवला. रायगडावर वास्तव्यास असताना त्यांनी ‘शिवभूषण’ आणि ‘शिबाबावनी’ या ब्रज भाषेतील अजरामर काव्यग्रंथांची निर्मिती केली. हे काव्य म्हणजे समकालीन कवीने शब्दांकित केलेला महाराजांचा खराखुरा इतिहास आहे.
◾ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार ‘शिवकाव्य’
दैनंदिन आयुष्यातील अडचणी, अभ्यासाचा ताण, यश-अपयशाची भीती यावर मात करण्यासाठी ‘शिवकाव्य’ एक ऊर्जास्रोत ठरते. आपला आत्मविश्वास बुलंद करण्याचे सामर्थ्य या काव्यात आहे. आपला देश, देव, धर्म आणि संस्कृती किती श्रेष्ठ होती, याची जाणीव हे काव्य करून देते. महाराजांचा पराक्रम केवळ हिंदुस्थानातच नव्हे, तर जगभरात कसा पसरला होता, याचा उलगडा या प्रयोगातून होणार आहे.
◾६० हून अधिक कलाकारांचा सहभाग
‘शिवराज भूषण’ या महानाट्याचे वैशिष्ट्य म्हणजे मालवणमधील ६० हून अधिक शिवप्रेमी कलाकारांनी ही नाट्यकृती साकारली आहे. विररसाने ओतप्रोत भरलेले हे काव्य आचरणात आणल्यास तरुणांना अपयशावर मात करून नवा इतिहास घडवण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा:
महानाट्य: शिवराज भूषण
दिनांक: २२ मार्च २०२६
वेळ: सायंकाळी ७:०० वाजता
ठिकाण: स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी
आयोजक: श्री शिवराज मंच, रत्नागिरी/मालवण
👉🏻यशवंत आणि कीर्तिवंत होण्याचा संकल्प घेऊन विद्यार्थ्यांनी आणि रत्नागिरीतील नागरिकांनी या महानाट्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवराज मंच मालवण यांच्यातर्फे करण्यात आले आहे.



