
मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला जयगड व वेंगुर्ला येथे नवे थांबे; महिनाभरात जेट्टी काम पूर्ण होणार!
मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेला सुरूवात झाली आहे. रत्नागिरीतील जयगड, सिंधुदुर्गातील वेंगुर्ला हे दोन नवे थांबे रो-रो मार्गावर मिळणार आहेत. या ठिकाणच्या जेट्टीचे काम पूर्ण करण्यासाठी सागरी महामंडळाने प्रयत्न सुरू केले. महिनाभरात या जेट्टीचे काम पूर्ण करून रो-रो सेवेला दोन ठिकाणी थांबा दिला जाणार असल्याची माहिती मत्स व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.
सागरी महामंडळाकडून नेरुळ ते मुंबई जलवाहतूक सेवाही सुरु करण्यात येणार असल्याचेही सांगितले. महायुती सरकारने कोकणातील पर्यटन उद्योगाला गती देण्यासाठी मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रो-रो सेवेला गती दिली. या मार्गावर आता विजयदुर्गसोबत इतर थांबे देण्याची मागणी कोकणवासियांकडून होत आहे. जयगड येथे औद्योगिक व बंदरविकासाच्या दृष्टीने हा थांबा महत्त्वाचा मानला जात आहे. वेंगुर्ला येथील थांब्यांमुळे मालवण, तारकर्ली, आचरा परिसरातील पर्यटनस्थळांना बळ मिळणार आहे.
मंत्री नितेश राणे म्हणाले की, कोकण किनारपट्टीसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या या जलवाहतुकीच्या नव्या पर्यायामुळे कोकणातील पर्यटनाला अधिक चालना देण्याचा उद्देश असून या वाहतूक सेवेमुळे चाकरमन्यांच्या वेळेतही बचत होणार आहे. नव्या जेट्टी कार्यान्वित झाल्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारी भागांना थेट जलमार्गे जोडणी मिळणार आहे. त्यामुळे पर्यटन, मत्स्यव्यवसाय तसेच स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.




