मुंबई महापालिका आयुक्तपदी भिडे, बहुमान मिळविणार्‍या पहिल्या महिला!

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांच्या अप्पर मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची नियुक्ती निश्चित झाली असून, मंगळवारी त्या पदभार स्वीकारतील. मुंबई महापालिकेच्या त्या पहिल्या महिला आयुक्त असतील. भिडे या भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९५ च्या तुकडीतील अधिकारी आहेत.

त्यांनी यापूर्वीही मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी काम केले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी मंगळवारी सेवानिवृत्त होत आहेत. महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आली असून मुंबईकरांना दिलासा देणार्‍या अनेक योजनांची मुख्यमंत्र्यांनी आखणी केली आहे. या योजना मार्गी लावण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आपल्या विश्वासू अधिकारी भिडे यांच्यावर सोपवली आहे.

पालिका आयुक्त पदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांची नावे चर्चेत होती. शिंदे यांचा भिडे यांच्या नावाला विरोध असल्याची चर्चा होती. त्यामुळे भिडे यांनी सोमवारी शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर हा विरोध मावळला. भिडे यांनी यापूर्वी एमएमआरडीए तसेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे.

मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात नव्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होणार, याची प्रशासनात उत्सुकता होती. मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या अश्विनी भिडे यांचे नाव सर्वात आघाडीवर होते. अखेर त्यांच्याच नावावर सोमवारी उशिरा शिक्कामोर्तब झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button