
मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात भीषण अपघात; कंटेनर दीडशे फूट खोल दरीत कोसळला !
चालक गंभीर जखमी
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात सोमवारी ९ मार्च दुपारी भीषण अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेला कंटेनर नियंत्रण सुटून महामार्गाच्या डाव्या बाजूला सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
सोमवार, दि. ९ मार्च रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. गोव्याहून मुंबईकडे जाणारा कंटेनर भोस्ते घाटातील धोकादायक वळणावर आला असता अचानक नियंत्रण सुटल्याने तो थेट दरीत कोसळला. अपघाताची तीव्रता इतकी होती की कंटेनरचे चेसिस एका बाजूला तर लोखंडी सांगाडा सुमारे दीडशे फूटांहून अधिक खोल दरीत जाऊन पडला.
दरम्यान, भोस्ते घाटातील ज्या ठिकाणी हा अपघात झाला आहे त्या परिसराला राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने यापूर्वीच ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून घोषित केले आहे. या भागात वारंवार अपघात होत असल्याने अपघात रोखण्यासाठी घाटाच्या बाजूला मजबूत संरक्षण भिंत उभारण्याचे कामही सध्या सुरू आहे.
मात्र, तरीही या घाटात अपघातांचे सत्र सुरूच असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले असून जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.




