
मुंढर गावातील ओळवण वाडीत पालखी नृत्याचा रंगतदार सोहळा उत्साहात

मुंढर (ता. गुहागर) गावातील ओळवण वाडी येथे शिमगोत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक पालखी नृत्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालखी नृत्याचा रंगतदार सोहळा उत्साहात झाला. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पारंपरिक संस्कृतीचा देखणा आविष्कार या ठिकाणी पाहायला मिळाला.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती प्रणव पोळेकर उपस्थित होते. तसेच पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ आणि मंगेश जोशी यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून कलाकारांचे व आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी पारंपरिक पालखी नृत्यासोबत विविध देखावेही सादर करण्यात आले. रंगीबेरंगी वेशभूषा, ढोल-ताशांच्या गजरात सादर करण्यात आलेले पालखी नृत्य आणि सामाजिक-पौराणिक विषयांवरील देखावे यामुळे उपस्थित ग्रामस्थांना उत्सवाचा आनंद लुटता आला.
कोकणात शिमगोत्सवाच्या काळात ग्रामीण भागात अशा प्रकारच्या पालखी नृत्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या परंपरेमुळे स्थानिक कला, संस्कृती आणि लोकपरंपरा जपल्या जात असून नव्या पिढीला या संस्कृतीची ओळख होत असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील तरुण मंडळ व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.




