
मिरजोळे वरचीवाडी प्राथमिक शाळेत बालकलाकारांचा रंगला दिमाखदार ‘कलावैभव’ सोहळा

रत्नागिरी : शहरानजिकच्या जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा मिरजोळे वरचीवाडी व अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारा विविध गुणदर्शन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शालेय जीवनात अभ्यासासोबतच कलेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यां उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय मंगलमय वातावरणात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य वैभव पाटील, मिरजोळे ग्रा.पं. माजी सरपंच गणेश पाडावे, वरचीवाडी प्रमुख दिनेश पाडावे, संतोष पाडावे, दीपक गावकर व सौ. समीक्षा पाडावे यांसह प्रतिष्ठीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या मध्यंतरात नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य वैभव पाटील यांचा शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. सोहळ्याच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक साची शिंदे सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षिका सौ. मनाली पाटील तसेच अंगणवाडी बाई व मदतनीस आणि पालकांनी विशेष परिश्रम घेतले.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम. रंगमंचावर अवतरलेल्या चिमुकल्यांनी ‘दीपनृत्य‘ आणि लयबद्ध ‘कोळीगीतांनी‘ उपस्थितांची मने जिंकली. केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘देशभक्तीपर गीते‘ आणि ‘पर्यावरण रक्षणाचे‘ संदेश देणाऱ्या नाटुकल्यांतून सामाजिक भानही जपत सर्वांना अंतर्मुख केले. विशेषत ‘मराठी भाषा संवर्धन‘ आणि ‘मराठी शाळा टिकवण्यासाठी‘ सादर केलेल्या जनजागृतीपर गीताला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. मूल्य शिक्षणावर आधारित नाटय़छटा आणि विनोदी प्रहसनांनी कार्यक्रमात अधिक रंगत भरली.




