मिरकरवाडा येथे हल्ल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा परिसरात एका मच्छिमारावर चाकूने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ मार्च रोजी सकाळी ११ च्या सुमारास मिरकरवाडा जेटीच्या पहिल्या गेटजवळ घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयेंद्र दत्ताराम नार्वेकर (वय ५५, रा. भाट्ये-मिऱ्या) हे आपल्या मोटारसायकलने (क्र. एमएच ०८/बएफ/२३२३) बोटीच्या कामासाठी मिरकरवाडा जेटीकडे जात होते. सकाळी ११ च्या सुमारास मिरकरवाडा जेटीच्या पहिल्या गेटजवळ शशांक सावंत आणि संजू (पूर्ण नाव माहित नाही) यांनी आपली मोटारसायकल आडवी लावून नार्वेकर यांना अडवले. १ मार्च रोजी भाट्ये-मिऱ्या येथील दत्तमंदिर परिसरात झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून त्यांनी नार्वेकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
शशांक आणि संज यांनी चाकू बाहेर काढून नार्वेकर यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच वेळी त्या ठिकाणी रूपेश कमलाकर सावंत ऊर्फ ‘छोटा भाई’ हा आला. त्याने आपल्याकडील चाकूने जयेंद्र नार्वेकर यांच्या पाठीवर, कमरेवर, खांद्यावर, हात आणि पोटावर एकामागून एक सपासप वार केले. या हल्ल्यात नार्वेकर गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी रूपेश कमलाकर सावंत ऊर्फ छोटा भाई, शशांक सावंत, संजू (पूर्ण नाव माहिती नाही) (सर्व रा. सडा-मिऱ्या, रत्नागिरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी ७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०९ (जीवे मारण्याचा प्रयत्न), १२६(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे. हल्ल्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button