“माझा दोष इतकाच की मी परखड बोलतो”, आदित्य ठाकरेंबरोबर मतभेदाच्या चर्चांवर संजय राऊत स्पष्टच बोलले!

Sanjay Raut clarifies internal conflict with Aditya Thackeray and rumors of leaving Shiv Sena UBT : राज्यसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना (ठाकरे) अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे सांगितले जात असून राऊत हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचेही बोलले जात आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी स्वत: हा दावा फेटाळून लावत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

आदित्य ठाकरे-संजय राऊत यांच्यात मतभेद?

संजय राऊत यांना आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच्या मतभेदांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना राऊत म्हणाले की, “माझ्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कसले मतभेद असणार? अत्यंत चुकीच्या बातम्या आहेत. कोणीतरी मला फोन करून विचारलं का? किंवा आदित्य ठाकरे यांना विचारलं का? मुळात जी बैठक झाली असं म्हणत आहेत, त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. मी दिल्लीत माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमाला होतो. मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे. या पक्षात मी काही राज्यसभेचा खासदार व्हायला आलो नाही… आमदार, खासदार मंत्री व्हायला आलेलो नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाता येईल, संघटनेचं उत्तम काम करता येईल या विचाराने मी या पक्षात सतत काम करणारा एक सामान्य शिवसैनिक आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

माझा दोष इतकाच आहे की…

“जरी मला बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचा नेता केला, अनेक वर्ष खासदार केलं तरी मी स्वतःला एक शिवसैनिक मानतो. माझा दोष इतकाच आहे की मी माझी मतं परखडपणे मांडतो. हे सुद्धा मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडूनच शिकलो आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.

या पक्षातील माझं अस्तित्व, वास्तव्य हे आमदार-खासदार आणि मंत्री होण्यासाठी नाही. माणसाला केव्हातरी एखाद्या पदाचा निरोप घ्यावा लागतो त्याची मानसिक तयारी ठेवावी लागते, असेही संजय राऊतांनी यावेळी स्पष्ट केले.

संजय राऊत शिवसेना सोडणार?

संजय राऊत हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. याबद्दल विचारले असता राऊत म्हणाले की, “मी माझ्या बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या पक्षातच आहे आणि राहणार आहे. हा विचारही माझ्या मनाला कधी शिवला नाही. राज्यसभा खासदार किंवा लोकसभा खासदार होणं हे माझ्या जीवनाचं इप्सित कधीच नव्हतं आणि राहणारही नाही.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button