महिलांनी कायदेशीर हक्काबाबत जागरूक व्हावे-जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे


रत्नागिरी, दि. 12 ):- महिलांनी त्यांच्या कायदेशीर हक्कांबद्दल जागरूक रहाणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे केले.
तालुका विधी सेवा समिती व सहयाद्री तंत्रनिकेतन महावि‌द्यालय सावर्डे, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आज महिलांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी शिबीराचे आयोजन करणेत आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी प्राचार्य मंगेश भोसले, प्राध्यापक लिना जावकर, अॕड. वृषाली सावंत, जिजाऊ ब्रिगेडच्या अनुजा भोसले आदी उपस्थित होते.
न्यायाधीश श्रीमती नेवसे यांनी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींना 8 मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिवस’ म्हणून का साजरा केला जातो याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. गेल्या 120 वर्षापासूनचा कालखंड विचारात घेतल्यास असे दिसून येते की, 8 मार्च या दिवशी जगभरात कुठे ना कुठे महिलांनी क्रांती केलेली आहे, त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष केला आहे व न्याय मागण्यासाठी लढा दिलेला आहे, असेही त्या म्हणाल्या.
शिबीरात महिलांना घटनेने दिलेले अधिकार व महिलांविषयी असलेल्या विविध कायद्यांच्या तरतुदींबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. सध्याच्या जीवनशैलीतील बदल, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महिलांच्या जटील समस्या व त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अस्तित्वात आलेले प्रगल्भ कायदे, महिलाविषयक शासनाच्या विविध योजना, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या विविध न्याय निवाड्यातील महिलांच्या संरक्षण आदेश व मार्गदर्शक तत्त्व याबाबत सखोल माहिती दिली. हुंडाबळी, बलात्कार, छेडछाड, विनयभंग, रॅगींग, लैंगिक छळ, घटस्फोट, द्वीभार्या, स्त्रीधनाचे प्रश्न, स्त्रीयांच्या संपत्तीचे प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार या महिलांवरील अत्याचारासाठी स्त्री संरक्षण कायदे तिचे खरे मार्गदर्शक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा न्यायाधीश डॉ. नेवसे यांनी विविध कायद्यांबाबत माहिती देताना हुंडाप्रतिबंधक कायदा, विविध कायद्यातील पोटगीच्या तरतुदी, मुस्लीम स्त्री संरक्षण कायदा, हिंदू वारसा कायदा, हिंदू दत्तक भरणपोषण कायदा, गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा, कामाचे ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा इत्यादी कायद्यांच्या महत्वपूर्ण तरतुदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. जोपर्यंत समाजातील सर्व स्तरावरील महिलांमध्ये महिला कायदेविषयक जागरूकता होणार नाही, तोपर्यंत विविध संरक्षण यंत्रणांना त्यांना सहजरित्या मदत करणे शक्य होणार नाही. उपस्थित वि‌द्यार्थीनींना महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रेरणा देण्यासाठी व त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना समर्पित केलेली “पंख माया मुक्तीचे सावित्रीबाई फुले” ही कविता सादर केली.
कार्यक्रमाला तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन तालुका विधी सेवा समितीच्या कनिष्ठ लिपीक श्री. जुगधर, शिपाई श्री. मरके व श्री. इंगळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button