
महागाईचा मोठा चटका! घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचे दर भडकले
आज ७ मार्चपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाली आहे.त्याचप्रमाणे, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरातही आजपासूनच ११५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याचा मोठा फटका हॉटेल, रेस्टॉरंट आणि छोट्या व्यावसायिकांना बसणार आहे.दिल्लीमध्ये १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ८५३ रुपयांवरून ९१३ रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत, घरगुती एलपीजी सिलिंडरचा नवीन दर आता ९१२.५० रुपये आहे, जो पूर्वी ८५२.५० रुपयांवरून वाढला आहे. कोलकातामध्ये किंमत ८७९ रुपयांवरून ९३९ रुपये झाली आहे, तर चेन्नईमध्ये ती ८६८.५० रुपयांवरून ९२८.५० रुपये झाली आहे. सुधारित दर आजपासूनच लागू झाले आहेत.
ही वाढ व्यावसायिक एलपीजी सिलिंडरवर देखील लागू होते. दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७६८.५० रुपयांवरून १८८३ रुपये झाली आहे. मुंबईत ही किंमत १७२०.५० रुपयांवरून १८३५ रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे, कोलकातामध्ये ही किंमत १८७५.५० रुपयांवरून १९९० रुपये झाली आहे, तर चेन्नईमध्ये ती १९२९ रुपयांवरून २०४३.५० रुपये झाली आहे.




