
मराठीच्या बोलींचे संवर्धन गरजेचे
विश्वेश जोशी यांचे प्रतिपादन; फाटक हायस्कूल येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा
रत्नागिरी :
प्रमाण मराठीच्या विविध बोलींचे संवर्धन करणे गरजेचे असून मराठी भाषेचा आदर करताना अन्य भाषांचा अनादर करू नये, असे प्रतिपादन मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी यांनी केले. फाटक हायस्कूल व गांगण – केळकर कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमात जोशी बोलत होते.
मराठी भाषा गौरव दिनाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाली. त्यानंतर जुई जोशी हिने मराठी अभिमान गीत सादर केले. कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. मराठी भाषेतील विविध साहित्य प्रकारांचा परिचय या निमित्ताने विद्यार्थ्यांना करून देण्यात आला. नाट्य उताऱ्याचे अभिवाचन अन्वय बोरकर याने तसेच लावणीचे सादरीकरण निधी भडेकर हिने, तर अभंग गायन शमिका शेवडे आणि वेदश्री सातवळेकर यांनी केले. मराठी भाषेच्या जन्माची कथा सिद्धी मोडक हिने सादर केली. याप्रसंगी तपस्या बोरकर आणि कल्याणी चव्हाण यांनी भाषाभिमान व्यक्त करणारे मनोगत केले. उपस्थितांचे आभार वेदा प्रभूघाटे हिने मानले तर सूत्रसंचालन हर्षदा केळकर हिने केले.




