
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये “समुद्री शेवाळ संवर्धन”वर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत झाडगाव (रत्नागिरी) येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आणि जलजीविका रत्नागिरी – युएनडीपी-जीसीएफ प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये “समुद्र शेवाळ संवर्धन : सद्यस्थिती आणि भवितव्य” या विषयावर एकदिवसीय विचारमंथन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेस एकूण ६७ लाभार्थी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोवा येथील संशोधक, वनविभाग आणि कोकण कृषी विद्यापीठाचे तसेच एन.जि.ओ. चे अधिकारी आणि कर्मचारी, मत्स्य शेतकरी, मत्स्य व्यवसाईक, मच्छिमार बांधव आणि विद्यार्थी हजर होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे, मत्स्य अभियांत्रिकी तंत्र निकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, प्रा. डॉ. आसिफ पागरकर, जिल्हा समन्वयक सहयोगी, UNDP, GCF, ECIRCC प्रकल्प ऋषिकेश भाटकर, जलजीविका संस्थेचे जिल्हा समन्वयक चिन्मय दामले, वनविभागाचे वनरक्षक मिलिंद डाफळे हे उपस्थित होते.
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रा. डॉ. आसिफ पागरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण केले. तर प्रमुख पाहुणे डॉ. अनिल पावसे यांनी समुद्र शेवाळ सिड बँकसाठी नव्यानेच जाहीर मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये तरतूद केली असल्याचे सांगितले. विक्री व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन यांची व्यवस्थित सांगड घातली, तर समुद्र शेवाळ शेती नक्की यशस्वी होईल असे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मत्स्य अभियांत्रिकी तंत्र निकेतन, शिरगावचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी समुद्र शेवाळ शेती ही सागरी मासेमारी आणि पर्यावरण पूरक असल्याने मोठ्या प्रमाणात याशेतीचा अवलंब झाल्यास पर्यावरण तर योग्य राहीलच त्याबरोबर आर्थिक आणि सामाजिक विकास सुद्धा होईल, त्याकरिता विद्यापीठाचे शास्त्रज्ञ नेहमी तत्पर असतील असे सांगितले.
ही कार्यशाळा मुख्यता तीन तांत्रिक सत्रामध्ये आयोजित केली होती.
‘सद्यस्थिती आणि शाश्वतता’ या पहिल्या तांत्रिक सत्रामध्ये प्राचार्य डॉ. चौधरी यांनी भारतातील शेवाळ शेतीची सद्यस्थिती यावर मार्गदर्शन केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसिनोग्राफी (गोवा) येथील संशोधकानी “कोकण किनारपट्टीवरील विविध समुद्री प्रजातींची वाढ व लागवड तंत्रज्ञान” याबाबत त्यांनी केलेला अभ्यास आणि अनुभव सांगितले.
‘उद्योजकता आणि उपजीविका’ या दुसऱ्या तांत्रिक सत्रामध्ये कांदळवन कक्षच्या (कांदळवन प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग) श्रीमती पूजा लोटे, यांनी ‘कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान अतंर्गत दिल्या जाणाऱ्या प्रकल्प आणि सुविधा’ या बद्दल माहिती दिली. गद्रे मरीन एक्सपोर्टच्या (रत्नागिरी) श्रीमती प्रेरणा हिरवे, यांनी समुद्री शेवाळ शेतीचा अनुभव कथन केले. राफटेक सोलुशन्स प्रा.ली.चे (मुंबई) अक्षय जाधव यांनी “समुद्री शेवाळ शेतीपासून उच्च मूल्य उत्पादनांपर्यंतचा प्रवास” या विषयावर माहिती देत मूल्यवर्धनातील संधी स्पष्ट केल्या.
‘नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान’ या तिसऱ्या तांत्रिक सत्रामध्ये केंद्रीय मीठ आणि सागरी रसायने संशोधन संस्थेचे (भावनगर, गुजरात) प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. वैभव मंत्री यांनी ‘कप्पाफायकस, ग्रासिलेरिया व इतर समुद्री शेवाळ शेती पद्धतींचा तुलनात्मक आढावा’ याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रा. डॉ. ए. यू. पागरकर यांनी ‘समुद्री शेवाळवरील प्रक्रिया आणि मूल्यवर्धनातील तांत्रिक नवकल्पना’ यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी चर्चासत्र व प्रश्नोत्तर सत्र झाले. ज्यामध्ये सहभागी लाभार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. तसेच सहभागींस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यशाळेमुळे समुद्री शेवाळ शेतीकडे शाश्वत उपजीविकेचा प्रभावी पर्याय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन अधिक बळकट झाला असल्याचे दिसून आले. या कार्यक्रम आयोजनासाठी ‘जलजीविका रत्नागिरी – UNDP, GCF, ECIRCC प्रकल्प’ कडून आर्थिक सहाय्य लाभले.
सूत्रसंचालन वरिष्ठ संशोधन सहाय्यक सौ. अपूर्वा सावंत यांनी केले. आभार प्रदर्शन सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. सचिन साटम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आसिफ पागारकर, अभिरक्षक व प्रा. डॉ. हरिष धमगये, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीम. वर्षा सदावर्ते, अपूर्वा सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच मत्स्यअभियांत्रिकी तंत्रनिकेतनमधील डॉ. राकेश जाधव, प्रा. निलेश मिरजकर, प्रा. रोहित बुरटे, सुशील कांबळे, पंकज सिडाम, संदेश चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. हृषीकेश भाटकर, जलजीविका, रत्नागिरी येथील चिन्मय दामले, श्रीम. सृष्टी सुर्वे, श्रीम. समृद्धी सनगरे, श्रीम. पियूषा देसाई, रोहन गुरव, श्री. बिर्जे यांनी विशेष परिश्रम घेतले.




