मंडणगड तालुक्यातील वलौते पाबलवाडी येथे जमिनीच्या वादातून वृद्धावर हल्ला


मंडणगड तालुक्यातील वलौते पाबलवाडी येथे जमिनीच्या वादातून एका वृद्धावर हल्ला केल्याची घटना घडली असून या प्रकरणी चौघांविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २८ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता वलौते पाबलवाडी येथे घडला. याबाबत मनोहर वराडकर (वय ७२, व्यवसाय शेती, रा. वलौते पाबलवाडी, ता. मंडणगड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या माहितीनुसार, दीपक वराडकर (५४), ज्योती वराडकर (४५), निखिल वराडकर (२२) आणि क्षितीज वराडकर (१९, सर्व रा. वलौते पाबलवाडी) हे चौघे त्यांच्या घरात परवानगीशिवाय आले. जमिनीच्या वादाच्या कारणावरून त्यांनी फिर्यादीशी वाद घालत दमदाटी व शिवीगाळ केली.

यावेळी दीपक वराडकर याने धारदार हत्याराने मनोहर वराडकर यांच्या डोक्यावर वार केला. तसेच निखिल वराडकर याने त्यांना पकडून ठेवले, तर क्षितीज वराडकर याने लोखंडी सळीने त्यांच्या डाव्या हातावर व पाठीवर मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना घराबाहेर ओढत आणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तेथून पळ काढला.

या प्रकरणी चारही आरोपींविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button